Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATM Transaction Fail: अकाउंटमधून कट झाले मात्र, ATM मधून पैसे बाहेरच आले नाही, किती दिवसांनी मिळेल रिफंड?

Bank ATM

Image Source : www.payquik.my

बँक खात्यातून पैसे कट झाले मात्र, ATM मधून बाहेर आलेच नाही तर किती दिवसांत पैस माघारी मिळतील? जर पैसे खात्यात माघारी आले नाही तर भरपाई मिळते का? याची तक्रार नक्की कोठे करायची? RBI चे नियम काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेखात जाणून घ्या.

डिजिटल पेमेंटचा वापर वाढल्याने ATM चा वापर पहिल्यापेक्षा कमी झाला आहे. ऑनलाइन व्यवहार झटपट होत असल्याने अनेकजण कॅशमध्ये व्यवहार करत नाही. मात्र, असे असले तरी प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये थोडी तरी कॅश असतेच. त्यामुळे ATM मध्ये जाण्याची वेळ येतेच. मात्र, काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे बँक खात्यातून पैसे कट होतात. मात्र, ATM मधूनच बाहेर येत नाही. तेव्हा मात्र, डोक्याला ताप होतो.

कट झालेले पैसे किती दिवसांत मिळतात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, जर तुम्ही ATM द्वारे व्यवहार केला मात्र, पैसे मशिनमधून बाहेर न येता खात्यातून कट झाले तर बँकेला पैसे परत करावे लागतात. T+5 दिवसांत म्हणजेच व्यवहार केल्यानंतरच्या 5 दिवसांत ऑटोमॅटिकली पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. 

जर पाच दिवसांच्या आत जर तुम्हाला पैसे माघारी मिळाले नाही तर बँकेला भरपाई द्यावी लागेल. प्रति दिन 100 रुपये बँकेला द्यावे लागतील. T+5 दिवसानंतर नुकसान भरपाईची रक्कम मोजली जाईल. तुमचे कट झालेले पैसे आणि भरपाईची प्रति दिन 100 रुपये अशी रक्कम मिळेल.

बऱ्याच ग्राहकांना हा नियम माहिती नसतो. त्यामुळे ते भरपाईचा आग्रह धरत नाहीत. जर तुम्हालाही पाच दिवसानंतर पैसे मिळाले नाही तर तुम्ही बँकेची तक्रार करू शकता. 

ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यास सर्वप्रथम काय कराल?

ATM मशिनचा नंबर ATM वर दिलेला असतो. तो लिहून घ्या. 

तसेच ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जी पावती येते ती जपून ठेवा. पुरवा म्हणून ती तुम्हाला तक्रार करताना लागेल.  

तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा विभागाला (कस्टमर केअर) अशा व्यवहाराची माहिती द्या. तुमची तक्रार नोंदवून तक्रार क्रमांक घ्या

RBI च्या नियमानुसार एखादा ATM व्यवहार फेल झाल्यास 30 दिवसांच्या आत बँकेत तक्रार करणे आवश्यक आहे. तरच भरपाई मिळेल.

बँकेने तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्यास काय कराल?

ATM मधून पैसे न मिळता कट झाल्याची तक्रार बँकेने स्वीकारली नाही तर तक्रार करण्याचे इतरही पर्याय तुमच्या समोर आहेत. प्रत्येक बँकेत अंतर्गत लोकपाल विभाग असतो. या लोकपालांकडे तुम्ही तक्रार करू शकता. बँकेच्या संकेतस्थळावर लोकपाल विभागाचा इमेल आयटी, फोन नंबर मिळेल. 

जर बँकेच्या अंतर्गत लोकपाल विभागाकडून तक्रार निवारण झाले नाही तर तुम्ही RBI लोकपालांकडे तक्रार करू शकता. यासाठी RBI चे खास संकेतस्थळ आहे. त्यावर तुम्ही सविस्तर ऑनलाइन तक्रार करू शकता. पुरावा म्हणून व्यवहाराची पावती आणि इतर डिटेल्स लागतील. 

RBI लोकपालांकडूनही तक्रारीचे निवारण झाले नाही तर तुम्ही ग्राहक मंच न्यायालयाकडे तक्रार करू शकता. बँकेकडे केलेली तक्रार, बँकेचे आलेले उत्तर, मेल किंवा इतर पत्रव्यवहार, अकाउंट स्टेटमेंट, डेबिट मेसेज असे पुरावे ग्राहक न्यायालयाला द्यावे लागतील.