एलआयसीची ‘जीवन आनंद’ ही एक विमा पॉलिसी आणि पारंपरिक बचत योजना आहे. जी केवळ निवडलेल्या पॉलिसी मुदतीपर्यंतच नाही तर मुदत पूर्ण झाल्यानंतरही आर्थिक संरक्षण देते. तसेच योजनेच्या कालावधी दरम्यान बोनस देखील मिळतो. थोडक्यात, ही एन्डॉमेन्ट आणि होल लाईफ इन्शुरन्स योजना आहे. या पॉलिसीमध्ये प्रीमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहेत. म्हणजे जेवढ्या कालावधीची तुमची पॉलिसी आहे; तेवढ्याच कालावधीच्या प्रीमियमचे पेमेंट करू शकता. या पॉलिसीसाठी तुम्हाला एका महिन्यासाठी सुमारे 1400 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला 25 लाखांचे संरक्षण मिळते.
जीवन आनंद पॉलिसीचा कालावधी
एलआयसीच्या या पॉलिसीचा टेबल क्रमांक म्हणजे 915 असून यामध्ये प्रीमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहे. म्हणजेच जितक्या वर्षांची पॉलिसी असेल तितक्या वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीसाठी वयाची किमान अट 18 आणि कमाल 50 वर्षे आहे. कमाल मॅच्युरिटीचे वय 75 वर्षे आहे. पॉलिसीचा कालावधी 15 वर्षांपासून 35 वर्षांपर्यतचा आहे. पॉलिसीचा कालावधी असेल तितकाच प्रीमियमचा कालावधी असणार आहे.
4 रायडरची सुविधा
या पॉलिसीमध्ये 4 रायडर्सची सुविधा देखील मिळते. जसे की अॅक्सीडेंटल डेथ अँड डिसअॅबिलिटी रायडर, अॅक्सीडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म अॅश्युरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर.
दोन प्रकारच्या बोनसचा लाभ
यात दोन प्रकारच्या बोनसचा लाभ मिळतो. पॉलिसी जितकी जुनी असेल तितका वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनसचा (vested simple reversionary bonus) लाभ जास्त मिळेल. फायनल ऍडिशनल बोनसचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी 15 वर्षे जुनी असणे गरजेचे आहे. डेथ बेनिफिट संदर्भात जर पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर सम अश्युअर्डच्या 125 टक्के डेथ बेनिफिट मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळेस सम अश्युअर्ड बोनससोबत मिळतो. त्यानंतर जेव्हा पॉलिसीधारकाचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या कुटुंबाला सम अश्युअर्ड इतकी रक्कम पुन्हा मिळेल. ही पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षांनी कर्जाची सुविधादेखील उपलब्ध होते. तसेच या पॉलिसीतून टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकता.
प्रीमियम किती असेल?
समजा पॉलिसीधारकाचे वय 35 वर्षे आहे आणि त्याने 5 लाखांचा सम अश्युअर्ड घेतला आहे आणि पॉलिसी 35 वर्षांची आहे. तर एलआयसीच्या प्रीमियम कॅलक्युलेटरनुसार (LIC Premium Calculator) त्याचा वार्षिक प्रिमियम 16,300 रुपये असेल. सहा महिन्याचा प्रीमियम 8,200 रुपये, तीन महिन्याचा 4,200 रुपये आणि दरमहा 1,400 रुपये असेल. 35 वर्षांमध्ये त्याची एकूण जमा रक्कम 5.70 लाख रुपये असेल.
मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारा लाभ
एलआयसीने ज्या दराने बोनस जाहीर केला आहे त्या दराने मॅच्युरिटीच्या वेळेस एकूण 25 लाख रुपये मिळतील. यामध्ये बेसिक सम अश्युअर्ड 5 लाख, 8.60 लाख रुपये वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपये फायनल ऍडिशनल बोनस असेल. तसेच पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला 5 लाख रुपये पुन्हा मिळतील.