Life Insurance म्हणजेच जीवन विमा काढताना सर्वांत पहिला प्रश्न उभा राहतो की, कोणता विमा काढू? विमा एजंट किंवा कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे असलेल्या सर्व योजना सांगून मोकळे होतात. पण त्यामुळे एवढ्या सगळ्या पर्यायांपैकी आपल्याला कोणता पर्याय योग्य आहे, हा संभ्रम निर्माण होतो. विम्याचे प्रकार कोणते आणि प्रत्येक प्रकाराचे काय फायदे आहेत, हे जाणून घेतले तर काही प्रमाणात हा संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
विम्याचे प्रामुख्याने खालीलप्रमाणे प्रकार पडतात.
- मुदत विमा (टर्म इन्श्युरन्स)
- एन्डोमेंट इन्शुरन्स
- मनी बॅक प्लॅन
- आजीवन विमा पॉलिसी (होल लाइफ इन्श्युरन्स)
- पेन्शन विमा
मुदत विमा (टर्म इन्श्युरन्स) : हा सध्याच्या जीवन विमा योजनेतील लोकप्रिय प्रकार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आयुष्यभरासाठी विमा संरक्षण मिळते. या विम्याचा हप्ता तुलनेने खूप कमी असतो. विमा धारकाने निवडलेल्या मुदतीत त्याचा मृत्यू झाला तरच विम्याची रक्कम वारसाला (नॉमिनी) मिळते. या विम्याचे वैशिष्ट्य हे आहे की, मुदत संपेपर्यंत विमाधारक जिवंत राहिल्यास मुदतीशेवटी त्याला कुठलाही परतावा मिळत नाही. हा फक्त जोखमीचा किंवा मुदत विमा असल्याने यात मुदत संपल्यावर कुठलीच रक्कम मिळत नाही. आपल्या पश्चात कुटुंबाची आर्थिक परवड होऊ नये यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. 15 ते 20 हजार रुपये प्रत्येक वर्षासाठी भरून तुम्ही अंदाजित 1 कोटी रूपयांचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता.
विमा ही गुंतवणूक करण्याची योजना नाही. कारण यात मुदतीशेवटी मिळणार्या रकमेचा आयआरआर (इंटरनल रेट ऑफ रिटर्न) म्हणजेच व्याजदर काढला, तर तो बराच कमी येतो. म्हणूनच मुदत विमा हा सर्वोत्कृष्ट विमा प्रकार ठरतो.
एन्डोमेंट इन्शुरन्स : या विमा प्रकारात विमा मुदतीत मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळण्याची सोय तर असतेच, त्याचबरोबर मुदत संपल्यावर विमेदार हयात असेल तर त्याला विमारक्कम मिळण्याचीही तरतूद असते. या विमा प्रकारात मुदतीशेवटीही रक्कम देण्याची तरतूद असल्यामुळे याचा हप्ता टर्म इन्शुरन्सपेक्षा जास्त असतो. अशा प्रकारच्या विमा योजना खूप लोकप्रिय आहेत. यात लाभासहित (विथ प्रॉफिट) आणि लाभाविना (विदाऊट प्रॉफिट) असे पुन्हा दोन प्रकार असतात. लाभाविना एन्डोमेंट योजनेत मुदतीनंतर मिळणारी रक्कम आधीच ठरलेली असते. ती कमी-जास्त होत नाही. पण लाभासहित एन्डोमेंट योजनेत बोनससह रक्कम मिळत असल्याने हा विमाप्रकार जास्त लोकप्रिय आहे.
मनी बॅक प्लॅन : एन्डोमेंट इन्शुरन्स मधलाच एक प्रकार म्हणजे मनी बॅक प्लॅन आहे. यात प्लॅनमध्ये दर 5/10/15/20 वर्षांनी विमाधारकाला ठराविक रक्कम मिळते. ही योजनाही अत्यंत लोकप्रिय आहेत.
आजीवन विमा पॉलिसी (होल लाइफ इन्श्युरन्स) : वयाच्या 80 वर्षापर्यंत विमा हप्ता भरायचा आणि जमा झालेली रक्कम (विमा रक्कम) केवळ मृत्युपश्चात किंवा 80 वर्षे वय झाल्यावर मिळते, म्हणून या प्रकारच्या विम्याला होल लाइफ इन्श्युरन्स म्हणतात. यातही बोनससहित विमा आणि लाभविरहित विमा असे दोन प्रकार आहेत.
पेन्शन विमा : भारतात तसेच अनेक देशांतली नागरिकांचे आयुर्मान वाढत आहे. अशा लोकांसाठी निवृत्तीनंतर चरितार्थाची तरतूद करायचा मार्ग म्हणजे पेन्शन विमा आहे. आपल्या उत्पन्नातील काही रक्कम आपल्या सेवानिवृत्ती नंतरच्या काळासाठी बाजूला ठेवून या योजनेद्वारे आपण आपली पेन्शन तयार करू शकतो. तसेच निवृत्तीच्या वेळी मिळालेली एकरकमी रक्कम या योजनेत गुंतविल्यास विमा कंपनी आयुष्यभर ठराविक रकमेची पेन्शन देते.