कोरोनासारख्या संकटातून कुटुंबाला सावरण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी आरोग्य विमा (Health Insurance) उतरवला जातो. या विम्याच्या माध्यमातून विमा कंपनी ग्राहकाच्या रुग्णालयाचा खर्च उचलते. पण दुर्दैवाने आरोग्य विमा धारकाचा मृत्यू झाल्यास पुढे विम्याचे काय होते, हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
सामान्यतः आरोग्य विमा घेताना कुटुंबातील सदस्यांना त्यात समाविष्ट करुन घेतले जाते. यामध्ये पत्नी आणि मुलांचा समावेश असतो. मेडिक्लेम (Mediclaim) पॉलिसीची जी निर्धारीत रक्कम असेल त्या संपूर्ण रकमेचे सुरक्षाकवच या प्रत्येक सदस्याला लागू असते. उदाहरणार्थ, आपण चार जणांच्या कुटुंबासाठी पाच लाखांचा मेडीक्लेम घेतला असेल आणि यातील एका व्यक्तीला रुग्णालयीन उपचारासाठी पॉलीसी वर्षात पाच लाख रुपये खर्च आला असेल तर तो विमा कंपनीकडून दिला जातो.
तथापि, रुग्णालयात भरती झाल्यानंतर विमाधारक कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबातील अन्य सदस्य विमा कंपनीकडे दाव्यासाठी अर्ज करु शकतात. क्लेम सेटलमेंटबाबत मागणी करु शकतात. अशा स्थितीत आरोग्य विम्यातून मृत व्यक्तीचे नाव वगळले जाते आणि पॉलिसीच्या अटी आणि नियमांनुसार हप्ता रिफंड केला जातो.
वारसदाराचा मृत्यू झाल्यास: पॉलिसीच्या काळात वारसदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका सदस्याला विमा कंपनीशी संपर्क करावा लागतो. अशा वेळी नवीन वारसदाराचे नाव सुचवून तसा फॉर्म भरला जातो. त्यानुसार विमा कंपनी वारसादारात बदल करते आणि अन्य सदस्यांची पॉलिसी सुरू राहते.
एकापेक्षा अधिक सदस्यांचा मृत्यू झाल्यास: एकापेक्षा अधिक सदस्यांचा मृत्यू झाल्यास रिएम्बर्समेंट क्लेम म्हणून त्याकडे पाहिले जाते आणि पॉलिसीत उल्लेख केलेल्या वारसदाराला क्लेम पेड केला जातो. कॅशलेस क्लेम असेल तर रुग्णालयाशी निगडीत खर्च थेटपणे रुग्णालयात जमा केला जातो.