विनातिकीट प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांवर रोज कारवाई केली जाते. अनेकदा आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून हे प्रवासी दंड भरण्याची तयारी दर्शवत नाहीत. रेल्वेकडे तर ऑनलाइन पेमेंट घेण्याची देखील व्यवस्था नव्हती. त्यामुळे UPI पेमेंटने दंड भरण्यासाठी तयार असलेल्या प्रवाशांकडून देखील दंड वसूल करता येत नव्हता. आता मात्र भारतीय रेल्वेने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम आकारण्यासाठी मध्य रेल्वेने एक खास ॲप तयार केले आहे. या ॲपचे नाव आहे ‘पेमेंट स्कॅनर ॲप’ (Payment Scanner App). या ॲपच्या सहाय्याने तिकीट तपासनीस दंड आकारू शकतात. गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासन या ॲपवर काम करत होते. या ॲपच्या निमित्ताने तिकीट तपासनीस आणि प्रवासी या दोघांचाही वेळ वाचणार आहे.
सध्या प्रायोगित तत्वावर या ॲपची तपासणी सुरु आहे. सध्या मुंबई विभागात 10 तिकीट तपासणीसांना हे ॲप देण्यात आले आहे. त्याचा वापर कसा करावा याचे देखील प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेंच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये काही तीकीओत तपासनीसांना हे ॲप देण्यात आले आहे.
रेल्वे होतेय डिजिटल
‘पेमेंट स्कॅनर ॲप’च्या मदतीने प्रवासी UPI कोड स्कॅन करू शकतील आणि दंडाची रक्कम भरू शकणार आहेत. दंडाची रक्कम थेट मध्य रेल्वेच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे पैशांचे अपहार देखील थांबणार आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे. येत्या काळात ही सुविधा सर्वच रेल्वेत सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. हळूहळू रेल्वेचा कारभार डिजिटल होत असून प्रशासन आणि प्रवासी दोघांसाठी हे फायद्याचे ठरत आहे.