Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Papa John’s India : भारतात पुन्हा परतणार यूएस पिझ्झा चेन पापा जॉन्स

Papa John’s India : भारतात पुन्हा परतणार यूएस पिझ्झा चेन पापा जॉन्स

Papa John’s to make a comeback in India : अमेरिकेत लोकप्रिय असलेली पिझ्झा चेन पापा जॉन्स भारतात परतणार आहे. यासंबंधीची योजनादेखील पापा जॉन्सनं आखलीय. भारतात व्यवसाय विस्तार करण्याच्या उद्देशानं पीजेपी इन्व्हेस्टमेंट ग्रुपसोबत भागीदारीदेखील केलीय.

पिझ्झा (Pizza) ही अलिकडच्या काळात एक आवडता पदार्थ झाला आहे. फास्ट फूडची (Fast food) संस्कृती भारतात रुजताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेत आधीच मोठमोठे खेळाडू असताना त्यात आता पापा जॉन्स मैदानात उतरत आहे. त्या दृष्टीकोनातून बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण करण्यासंबंधी एक पाऊल कंपनीनं टाकलं आहे. 2033पर्यंत देशात 650 आउटलेट्स उघडण्याची त्यांची योजना आहे. यातल पहिलं रेस्टॉरंट 2024मध्ये कर्नाटकातल्या बेंगळुरूमध्ये उघडलं जाणार आहे. पापा जॉन्स आधीही भारतात उलपब्ध होते, पण 2017मध्ये त्यांनी आपली भारतातली रेस्टॉरंट बंद केली होती.

दाक्षिणात्य राज्यांपासून देशभर विस्तार

अटलांटा, जॉर्जिया स्थित पापा जॉन्स पिझ्झा साखळीनं प्रथम प्राधान्य दाक्षिणात्य राज्यांना दिल्याचं दिसून येतंय. दक्षिणेकडच्या शहरांमध्ये आपली रेस्टॉरंट उघडण्याची आणि नंतर देशाच्या इतर भागांमध्ये विस्तार करण्याची योजना कंपनीनं आखली आहे. भारताचं आकारमान, मध्यमवर्गाच्या वाढत्या आकांक्षा आणि वाढतं उत्पन्न यामुळे पापा जॉन्सला भारत एक महत्त्वाची बाजारपेठ वाटते.

पीजेपीसोबत 2005मध्ये भागीदारी

पापा जॉन्स पिझ्झा चेननं पहिल्यांदा पीजेपीसोबत 2005मध्ये भागीदारी केली होती.कारण त्यांचा यूएईमध्ये (United Arab Emirates) विस्तार होत होता. पापा जॉनच्या उच्च गुणवत्ता मापदंडांच्या निर्दोष अंमलबजावणीची वचनबद्धता आता भारतात आणली जात आहे. निश्चितच आम्ही इथल्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहोत. असं पापा जॉनच्या चीफ इंटरनॅशनल आणि डेव्हलपमेंट ऑफिसर अमांडा क्लार्क यांनी सांगितलं.

पुढच्या 10 वर्षातलं उद्दिष्ट

पीजेपी इन्व्हेस्टमेंट ग्रुप यूएई, सौदी अरेबिया आणि जॉर्डनमध्ये 100हून जास्त पापा जॉन्सची रेस्टॉरंट चालवतो. 2024 साली इराकमध्ये पहिलं पापा जॉनचं आउटलेट उघडण्याचीदेखील योजना आहे. याविषयी पीजेपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तपन वैद्य म्हणाले, की पापा जॉन्सचा दक्षिण आशियातला विस्तार आमच्या लोकप्रिय पिझ्झा साखळीच्या ऑफरिंगसाठी मोठ्या प्रमाणात नवे ग्राहक देईल. आमची प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टमेंट फर्मनं पुढच्या 10 वर्षांत सुमारे 1,000 पापा जॉन्स रेस्टॉरंट्स चालवण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, 2040पर्यंत चीनमध्ये 1,750पेक्षा जास्त नवीन पापा जॉन्सची रेस्टॉरंट उघडण्याची योजना आखलीय, अशी माहिती पापा जॉन्सचे भागीदार फाउंटनव्हेस्ट पार्टनर्सनं सांगितलं.

जगातली तिसरी सर्वात मोठी पिझ्झा वितरण कंपनी

पापा जॉन्स पिझ्झाची सुरुवात 1984मध्ये झाली. पापा जॉन्सचा मूळ पिझ्झा मिश्रण केवळ सहा घटकांनी बनलेलं आहे. आपल्या खाद्य मेन्यूमध्ये कृत्रिम स्वाद आणि कृत्रिम रंग वापरला जात, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आलाय. डिसेंबर 2022पर्यंत जवळपास 50 देशांमध्ये पापा जॉन्स पिझ्झाची 5,700 रेस्टॉरंट होती. ही जगातली तिसरी सर्वात मोठी पिझ्झा वितरण कंपनी आहे.

भारतीय बाजारपेठेतले स्पर्धक

पापा जॉन्सनं भारतात आधीही पिझ्झा विकला आहे. मात्र 2017मध्ये आपली इथली रेस्टॉरंट बंद केली. आता पुनरागमनाची योजना आखली असली तरी भारतात आधीच पिझ्झा कंपन्यांनी आपलं बस्तान बसवलं आहे. सर्वात मोठा स्पर्धक असणार आहे डोमिनोज् पिझ्झा. डोमिनोजची भारतात 1700हून अधिक आउटलेट्स आहेत. पिझ्झा हट, ला पिनोज् यांच्या पिझ्झालादेखील मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत पापा जॉन्सची मागणी किती होते, यावरच त्यांचा व्यवसाय अवलंबून असणार आहे.