पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ. डॉमिनोज (Domino's), पिझ्झा हट (Pizza Hut), लझिज पिझ्झा (Laziz Pizza), केएफसी (KFC), मॅक्डोनाल्ड (McDonald's) असे असंख्य ब्रँड सध्या भारतात कार्यरत आहेत. तुम्ही कधी ना कधी या ब्रँडचा पिझ्झा खल्लाच असेल!
असो, पिझ्झा खाल्ल्यावर जेव्हा तुम्ही बिल भरता, तेव्हा त्यावर किती जीएसटी (GST) लावला आहे हे कधी तुम्ही तपासून बघितलंय का? पिझ्झावर किती टक्के GST लागतो हे कधी जाणून घेतलंय का? या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हांला माहीत नसतील तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे!
पिझ्झावरचे GST दर (GST Rate on Pizza)
जर तुम्ही हॉटेल/रेस्टॉरंटमध्ये जाऊन जर पिझ्झा खात असाल तर तुम्हांला एकूण बिलावर 5% GST भरावा लागतो. जर तुम्ही घरी पिझ्झा ऑर्डर केला असेल तर तुम्हांला 18% GST भरावा लागतो. तसेच तुम्ही फक्त पिझ्झा बेस (Pizza Base) मागवला तर तुम्हांला 12% GST भरावा लागतो. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की आपण खातोय तर पिझ्झाच! मग वेगवेगळे GST दर का बरे आकारले जात असतील?
हे आहे कारण!
GST नियमांमध्ये 'मिक्स्ड सप्लाय' (Mixed Supply) विषयी करांचे नियम अधोरेखित केले आहेत. याद्वारे जेव्हा ग्राहक एकापेक्षा अनेक सेवांचा जेव्हा उपभोग घेतो तेव्हा Mixed Supply नियमानुसार त्या सेवांचे एकत्रित बिल केल्यावर त्यावर GST लावला जातो. म्हणजेच खाद्यपदार्थावर 5% GST आहे, म्हणून तुम्ही हॉटेलमध्ये जेव्हा पिझ्झा खाल तेव्हा केवळ 5% GST भरावा लागेल. परंतु जेव्हा तुम्ही पिझ्झा घरी ऑर्डर कराल तेव्हा त्यावर डिलिव्हरी चार्जेससुद्धा द्यावे लागतील, जे 18% असेल. मिक्स्ड सप्लायमध्ये जो GST कर अधिक असेल तो लावला जातो. म्हणून होम डिलिव्हरी केलेल्या पिझ्झावर तुम्हांला 18% GST भरावा लागतो. तसेच टॉपिंगशिवाय पिझ्झा बेस ऑर्डर केल्यास त्यावर 12% GST भरावा लागतो.
जर Take Away ऑप्शन तुम्ही स्वीकारला असेल तर अशा प्रकरणात तुम्हांला केवळ 5% GST भरावा लागेल कारण त्यात हॉटेल तुमच्याकडून डिलिव्हरी चार्जेस आकारणार नाही.
याचाच अर्थ, पिझ्झा वरील GST वाचवायचा असेल तर सरळ हॉटेलमध्ये जावून पिझ्झा खायला हवा. त्यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच पण सोबत पिझ्झा खावून वाढलेल्या कॅलरीज देखील कमी होतील! आहे की नाही फायदेशीर टिप्स? मित्रांना आणि नातेवाईकांना ही माहिती जरूर शेयर करा!