ओयो आणि मेक माय ट्रीप या दोन कंपन्या कुणाला माहिती नसतील? प्रवास करणारे, पिकनिकला जाणारे लोक आधी या दोन वेबसाईटवर जातात, तिथे उपलब्ध असलेले हॉटेल्स, विला, पर्यटन स्थळे बघतात, त्याचे रीव्युव्ह बघतात आणि परवडणाऱ्या दरात हॉटेल बुकिंगची डील मिळत असेल तर बुकिंग करतात. या दोन्ही कंपन्या ग्राहकांना वेगवगेळ्या ऑफर्स देण्यासाठी प्रसिध्द आहेत.
आता पुढील काही महिन्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरु होणार आहेत. भारतात आणि जगभरात क्रिकेट रसिकांची काही कमी नाही. भारतात देखील महत्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. मुख्य म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे भारत-पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना रंगणार आहे. आता ज्या ज्या शहरांत क्रिकेटचे सामने रंगणार आहेत तिथे तिथे हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नफा कमविण्यासाठी मोठी संधी आहे हे काही वेगळे सांगायला नको. याच पार्श्वभूमीवर OYO आणि MakeMyTrip ने आपल्या पार्टनर विस्तारासाठी कंबर कसली आहे.
सामन्यांची घोषणा होताच हॉटेल महागले!
BCCI ने विश्वचषकाच्या सामन्यांची घोषणा केल्यापासून अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता आणि अन्य शहरात क्रिकेट सामन्यांच्या तारखांना हॉटेल बुकिंगमध्ये 100 ते 150% भाववाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यांत भारतात आगामी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे सामने आयोजित करणाऱ्या शहरांमध्ये सुमारे 500 नवीन हॉटेल्स जोडण्याची ओयोची योजना असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ओयोने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांच्या ठिकाणांभोवतीची हॉटेल्स एकमेकांशी जोडली जातील यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जगभरातून येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना डोळ्यासमोर ठेवून नवनवीन हॉटेल्सला जोडण्याची कंपनीने खास योजना बनवली आहे. ज्यायोगे हॉटेल व्यावसायिकांना देखील फायदा मिळणार आहे.
MakeMyTrip ने आणली होमस्टेची योजना!
क्रिकेट विश्वचषकाचे सामने ज्या शहरांमध्ये रंगणार आहेत तिथे हॉटेल्सला मागणी असणारच आहे. बरेचशे हॉटेल्स आधीपासूनच बुक करण्यात आले आहेत. अशातच MakeMyTrip ने ‘होमस्टे’ ऑप्शन देणाऱ्या व्यावसायिकांना करारासाठी आमंत्रित केले आहे. या योजनेत शहरातील जे घर मालक त्यांच्या घरात आदरतिथ्यासाठी प्रवाशांना सुविधा देऊ इच्छितात त्यांचे लिस्टिंग केले जाणार आहे. अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली, धर्मशाला, चेन्नई, लखनौ, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता आणि पुणे येथे विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. या शहरात होमस्टे सुविधा देण्यासाठी इच्छुक असलेल्यांना मेक माय ट्रीपकडून संपर्क केला जात आहे. हॉटेल्सऐवजी होमस्टेचा वाढता कल लक्षात घेऊन MakeMyTrip ने ही योजना आणली आहे.