गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही चित्रपट रसिकांना फक्त 99 रुपयांत चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. कारण, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) यंदाही 13 ऑक्टोबरला येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त फक्त 99 रुपयांत सिनेमा पाहता येणार असल्याचे जाहीर केले आहे. याविषयीचे डिटेल्स त्यांनी 21 सप्टेंबरला ट्विट करुन दिले आहे.
4000+ हून अधिक स्क्रीनवर पाहता येणार
MAI ने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय चित्रपट दिन पुन्हा म्हणजेच 13 ऑक्टोबरला येतोय. त्यामुळे जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी देशातील 4000+ हून अधिक स्क्रीन्सवर आमच्यासह सामील व्हा. तसेच, फक्त 99 रुपये किमतीच्या तिकीटात सिनेमा पाहा. हा दिवस मित्र परिवारासोबत आपल्या आवडत्या सिनेमांचा आनंद घेण्यासाठी खास आहे.
National Cinema Day is back on October 13th. Join us at over 4000+ screens across India for an incredible cinematic experience, with movie tickets priced at just Rs. 99. It's the perfect day to enjoy your favorite films with friends and family. #NationalCinemaDay2023 #13October pic.twitter.com/Pe02t9F8rg
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 21, 2023
या थिएटर्सचा आहे समावेश
समुहाने केलेल्या घोषणेनुसार, देशातील सुमारे 4000+ हून अधिक स्क्रीन्सवर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना फक्त 99 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निव्हल, मिरज, सिटीप्राईड, एशियन, मुक्ता A2 , मूव्हीटाईम, वेव्ह, M2K आणि डिलाईटसह आघाडीच्या मल्टिप्लेक्स चेन आणि स्टँडअलोन थिएटर्स या विशेष उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना फक्त 99 रुपयांत या थिएटर्समध्ये सिनेमा पाहण्याचा लाभ घेता येणार आहे.
गेल्या वर्षी होता प्रचंड प्रतिसाद
2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपट दिनाची सुरुवात झाली आणि चित्रपट रसिकांमध्ये तो प्रचंड हिट झाला. गेल्या वर्षी 23 सप्टेंबरला या दिवसाच्या पहिल्यावेळी 65 लाखांहून अधिक चित्रपट प्रेमींनी चित्रपटगृहांना भेट दिली होती. गेल्यावेळी सिनेमांच्या तिकीटांची किंमत फक्त 75 रुपये ठेवण्यात आली होती.