नायका कंपनीचा (Nykaa) IPO नोव्हेंबरच्या 2021 मध्ये बाजारात आला. आणि त्यानंतर त्याच क्षेत्रातली आणखी एक कंपनी मामाअर्थनेही (Mamaearth) आयपीओसाठी (IPO) आपली कागदपत्रं सेबीकडे (SEBI) सुपूर्द केली आहेत. या कंपन्यांचं मूल्यांकन आणि मागच्या काही दिवसांतली शेअर बाजारातली कामगिरी यामुळे ट्टिटरवर थोडी खळबळ उडालीय. या कंपन्यांची मजेशीर तुलना HUL, Adani यांच्यासारख्या दिग्गज कंपन्यांशी केली जातेय.
मामाअर्थ कंपनीने आपल्या आयपीओ कागदपत्रांमध्ये शेअर बाजारातून 3 अब्ज अमेरिकन डॉलर इतके पैसे उभं करण्याचं उद्दिष्टं ठेवल्याची बातमी अलीकडे फुटली होती. त्यानंतर ही तुलना आणि ट्विटरवर चर्चा सुरू झाली. जानेवारी 2022 मध्ये मामाअर्थ कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे त्यांचं एकूण मूल्य 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं. मग अचानक ते तिप्पट वाढलं कसं असा गुंतवणूकदारांचा प्रश्न आहे.
अर्थात, आयपीओसाठी त्यांनी सादर केलेली कागदपत्रं जाहीर झालेली नाहीत. आणि कंपनीचे संस्थापक वरुण अलग यांनीही मूल्यांकनाची माहिती आपण दिलेली नाही असं म्हटलंय. म्हणजे बाहेर आलेली बातमी खोटी आहे, असंच त्यांना सुचवायचंय. पण, चर्चा मात्र होतेच आहे.
मामाअर्थची नायकाशी का होतेय तुलना?
नायका या ब्रँडची मुख्य कंपनी FSN ई-कॉमर्सचा IPO गेल्यावर्षी आला तेव्हा पहिल्याच दिवशी त्याला बंपर प्रतिसाद मिळाला. आणि कंपनीचं मूल्यांकन अगदी 13 अब्ज अमेरिकन डॉलरवर गेलं. 1,125 रुपयांना आयपीओमध्ये मिळालेला शेअर पहिल्याच दिवशी 2018 रुपयांना उघडला. पण, त्यानंतर मात्र शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर आधी गुंतवणूक केलेल्या समभागधारकांनी आपली हिस्सेदारी विकण्यासाठी काही ब्लॉक डील केली.
आणि आता शेअर 150 रुपयांपर्यंत घसरलाय. हेच लोकांनी ट्विटरवर लिहिलंय. आणि म्हणून मामाअर्थची तुलना नायकाशी होतेय.
नायका कंपनीचं PE गुणोत्तर 960 इतकं प्रचंड आहे. PE म्हणजे प्राईस टू इर्निंग गुणोत्तर. शेअरची किंमत आणि त्यातून होणारी कमाई यांचं हे गुणोत्तर आहे. ते 20च्या आत असावं असा दंडक आहे. पण, सध्या ते 900 च्या घरात गेलंय. म्हणूनच आयपीओमध्ये मिळणारं मूल्यांकन आणि नंतरची कंपनीची कामगिरी यांचा ताळमेळ लागत नसल्याचं ट्विटरमधल्या संदेशांनी दाखवून दिलंय.