नायका (NAYKAA) हा ब्रँड चालवणारी मुख्य कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचरला कंपनीच्या हिस्सेदारीमध्ये मोठे बदल नोव्हेंबरपासून सुरू आहेत. यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही कंपनीने दोन मोठी ब्लॉक डील (Block Deal) केली होती. आता एका ताज्या ब्लॉक डीलसाठी कंपनीच्या एका आधीच्या समभाग धारकाने 148.90 रुपये प्रती शेअर इतकी किंमत मोजली आहे. ब्लूमबर्गने (bloomberg.com) ही बातमी दिली आहे. या ब्लॉक डीलमधून कंपनीला 26 दशलक्ष अमेरिकन डॉलर मिळाले. या ब्लॉक डीलमधून 1.4 कोटी शेअरच्या मालकीचं हस्तांतरण झालं आहे.
ब्लॉक डीलची ही ऑफर कोणी दिली ते मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. डिसेंबर महिन्यातही FSN कंपनीने आपले 1.3 % शेअर एका ब्लॉक डीलमध्ये विकले होते. तेव्हाच्या शेअरची संख्या 3.7 कोटी इतकी होती. त्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये 1.8 कोटी शेअरमध्ये ब्लॉक डील झालं होतं. लाईटहाऊस इंडिया या कंपनीने तेव्हा आपला हिस्सा विकला होता.
9 नोव्हेंबर हा आयपीओ नंतरचा लॉक-इन कालावधी होता. आणि तो उलटल्या नंतर FSN कंपनीमध्ये मोठ्या वाटाघाटी झाल्या आहेत. सेंगती इंडिया मॉरिशस, नॉर्जेस बँक, एबरडीन स्टँडर्ड एशिया फोकस, मॉर्गन स्टॅनले सिंगापूर या परदेशी कंपन्या किंवा संस्थांनी मोठ्या प्रमाणावर FSN मध्ये हिस्सेदारी घेतली होती.
ब्लॉक डील नंतर शेअर का पडला?
कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लॉक डील झाल्यानंतरही FSN कंपनीचा शेअर सध्या राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्येही जवळ जवळ साडेतीन टक्के खाली आहे. ब्लॉक डीलसाठी देऊ केलेली किंमत अवाजवी असल्याची शेअर बाजार गुंतवणूकदारांची भावना आहे.
बुधवारी ब्लॉक FSN कंपनीचा शेअर बंद झाला त्यापेक्षा आताचं ब्लॉक डील 4.5% कमी किमतीला झालंय. त्याचाच परिणाम लगेच शेअरवर दिसून येत आहे. हा शेअर अजूनही महाग असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ब्लॉक डील म्हणजे काय?
ब्लॉक डील म्हणजे शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी लावलेली बोली. आणि तो करार त्यानुसार पार पाडणं. ब्लॉक डीलची माहिती शेअर बाजार आणि नियामक संस्थेला द्यावी लागते.
ब्लॉक डील करणारे दोन गट कंपनीच्या बाहेरचेही असू शकतात. जसं नायका ब्रँडच्या बाबतीत घडलंय. प्रत्यक्ष प्रमोटर फाल्गुनी नायर यांच्या ताब्यात असलेल्या शेअरमध्ये व्यवहार झालेला नाही. तर कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक असलेल्या दोन गटांनी आपल्याकडचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले आहेत. असं परस्पर हस्तांतरण शक्य आहे.
फक्त त्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची मंजुरी लागते. आणि शेअर नियामक मंडळालाही आदी कल्पना द्यावी लागते. अशा ब्लॉक डीलमधून कंपनीची मालकी शक्यतो बदलत नाही.