Mamaearth IPO valuation concerns: शार्क टँक इंडिया सीझन वनची गुंतवणूकदार गजल अलग यांची कंपनी मामाअर्थ शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या तयारीत आहे. गेल्या 1 वर्षातच मामा अर्थचे मूल्यांकन 3 पटीने वाढले आहे. मामा अर्थ हा होनासा कंझ्युमर लिमिटेड (Honasa Consumer Private Limited) नावाच्या सौंदर्य उत्पादन कंपनीचा ब्रँड आहे. अलीकडेच, कंपनीने आयपीओमधून निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. मामा अर्थ फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करून 400 कोटी उभारण्याच्या तयारीत आहे. मामाअर्थच्या ऑफर फॉर सेलमध्ये 4.68 कोटी शेअर्स विकले जातील, ज्यामध्ये प्रमोटर, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांचा हिस्सा आहे.
शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मामा अर्थचा आयपीओ दुसरा पेटीएम ठरू शकतो. याचे कारण मामा अर्थचे मूल्यांकन खूप जास्त आहे. कंपनीला त्यांच्या आयपीओद्वारे (IPO) 3 अब्ज युएस डॉलरचे मूल्यांकन करायचे आहे. मामा अर्थने गेल्या वर्षी 22 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. जर कंपनी स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्या मूल्यांकनानुसार लिस्ट झालीच, तर ते नफ्याच्या हजार पटीने लिस्ट होणारी कंपनी ठरेल. विशेष म्हणजे, हिंदुस्थान युनिलिव्हरचा गेल्या वर्षीचा नफा 9 हजार कोटी होता आणि कंपनीचे मूल्यांकन 6 लाख कोटी आहे, ते 66 च्या पटीत आहे.
मामा अर्थ त्याच्या विक्रीचा एक मोठा भाग मार्केटिंगवर खर्च करत आहे. मामा अर्थच्या विक्री आणि विपणन खर्चावर नजर टाकली तर लक्षात येते की विक्रीच्या सुमारे एक तृतीयांश खर्च मार्केटिंगवर होत आहे. जाहिरातींच्या खर्चावर परतावा बघितला तर मामा अर्थचे हे प्रमाणही खूप कमी येत आहे. मामा अर्थच्या वापरकर्त्यांना त्याचे उत्पादन आवडत असेल तर त्यांनी हे उत्पादन पुन्हा पुन्हा खरेदी करावे, यासाठी सातत्याने हॅमरिंग केले जाते, ज्यासाठी जाहिरातींचा आणि मार्केटींगचा आधार घेतला जातो. मात्र कंपनीचा विपणन खर्च शून्य झाला पाहिजे, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र तसे होणे कठीण दिसत आहे.
मामा अर्थच्या जाहिराती आणि कमाईचे प्रमाण पाहिल्यास, मामा अर्थ एक रुपया खर्च करून 2.5 रुपयांचे सामान विकत आहे. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये मामा अर्थची एकूण कमाई 2 हजार कोटी आहे. त्यात जाहिरातींवर होणारा खर्च काढला तर तो जवळपास 600 कोटी रुपये झालेला आहे.
वर्ष | विक्री किती झाली | विपणन खर्च किती केला | किती मिळकत झाली |
2020 | 110 कोटी | 46 कोटी | 2.4 कोटी |
2021 | 460 कोटी | 178 कोटी | 2.6 कोटी |
2022 | 932 कोटी | 391 कोटी | 2.4 कोटी |