कू (Koo) हे भारतीय बनावटीचे सोशल मीडिया अॅप ट्विटरला स्पर्धेत मागे टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे. जागतिक स्तरावर जसे ट्विटर वापरले जाते. तसेच कू अॅप आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आणि सर्वमान्य करण्यासाठी कंपनी रणनीती आखत आहे. विशेषत: ट्विटरला प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर कू संधी शोधत आहे. एलन मस्क यांनी अनेक तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे.
ट्विट कू अॅपमध्ये मायग्रेट करण्याची सुविधा
कोणत्याही ट्विटर खातेधारकाला त्याने याआधी केलेले सर्व ट्विट कू अॅपवर हलवता (मायग्रेट) येतील. (Tweets Migrate to Koo) मात्र, लाइक्स, शेअर आणि कमेंट वगळून फक्त ट्विट कू अॅपवर घेता येतील, असे कू सोशल मीडिया अॅपचे सहसंस्थापक अपरमेय राधाकृष्ण यांनी सांगितले. यासाधी आम्ही एक सोपा पर्याय आणला आहे. सेटिंग्जमध्ये जाऊन मायग्रेट ट्विट्स या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचे जुने ट्विट्स कू अॅपवरती हलवले जातील. मात्र, तसे करण्याआधी कू अॅपवर खाते सुरू करावे लागेल, अन्यथा ट्विट्स मायग्रेट करता येणार नाहीत. खात्याची पडताळणी करण्यासाठी कू अॅपकडून काहीही शुल्क आकारले जात नाही.
ट्विटरमधील घडामोडी कू अॅपच्या पथ्थ्यावर
४४ बिलियन युएस डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी हजारो कर्मचारी कमी केले. तसेच अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी शुल्क लागू केले. अनेक आघाडीच्या पत्रकारांची खाती ब्लॉक केली तर विवादीत असलेली काही खाती पुन्हा सुरू केली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमावलीतही अनेक बदल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीचा फायदा कू अॅप घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कू अॅपने रणनीती आखली आहे.
फॉलोवर्सही कू वर दिसणार
ट्विटरवर ज्या लोकांना तुम्ही फॉलो करत होता त्यातील जे खातेधारक कू अॅपवर असतील, तेही तुमच्या फॉलोवर्स लिस्टमध्ये दिसतील. त्यासाठीही सोपा पर्याय आणला आहे. मात्र, जे खातेधारक कू अॅप नाहीत ते फोलोवर्स दिसणार नाहीत. कू हे सोशल मीडिया अॅप असून खातेधारकांची संख्या ५ कोटीपर्यंत झाली आहे. स्थानिक भाषेमध्ये व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य कू कडून दिले जाते. कू वरील खाते मोफत व्हेरिफाय करून मिळते. त्यानतंर खातेधारकाला पिवळ्या रंगाचा टॅग दिला जातो. या सेवेसाठी ट्विटरनी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. सर्जनशीलता, सोप्या भाषेत व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि विश्वास याच्याशी एलन मस्क तडजोड करत असल्याचा आरोप कू अॅपचे सहसंस्थापक राधाकृष्ण यांनी केला.