Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buy Pesticides Online: शेतकरी आता Amazon, Flipkart वरूनही कीटकनाशके खरेदी करू शकतात!

Farmers can buy Pesticides Online

Buy Pesticides Online: केंद्र सरकारने 1971च्या कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी शेतात वापरली जाणारी कीटकनाशके ऑनलाईन मागवू शकतात.

केंद्र सरकारने (Central Government)  शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी आता शेतात वापरण्यासाठी लागणारी कीटकनाशके (Pesticide) घरी बसून मागवू शकणार आहेत. केंद्र सरकारने नियमात बदल करून परवानगी दिली आहे. यासाठी कृषी मंत्रालयाने  1971 च्या कीटकनाशक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये 1971 चे नियम बदलण्यात आले असून कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्यांना आता सर्व माध्यमातून कीटकनाशकांची विक्री करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी एकच अट ठेवण्यात आली आहे की, परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची (E-Commerce Platform) असणार आहे.

कीटकनाशके कंपनींकडून आधीच मागणी

कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कीटकनाशक व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांकडून अनेक दिवसांपासून होत आहे. असे केल्याने कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचे म्हणणे होते.

शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरणार

कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांना सोयीसुविधांबरोबरच अस्सल कीटकनाशकेही मिळतील, असा विश्वास शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जावे लागणार नाही, घरपोच कीटकनाशक मिळणार आहे. भारतातील अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवर कीटकनाशके उपलब्ध असतील. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच दुकानांना विनाकारण भेटी द्याव्या लागणार नाहीत. शेतकरी फक्त ऑनलाईन ऑर्डर देऊन कीटकनाशकाची होम डिलिव्हरी मिळवू शकतील.

स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना स्वस्तात कीटकनाशके मिळतील

amazon आणि flipkart ला कायदेशीररीत्या कीटकनाशके विकण्यास हिरवा कंदील मिळाला असला तरी, कीटकनाशके विकणाऱ्या कंपनीला परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपनीने परवाना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनीची असेल. त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढेल. यामुळे शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके स्वस्त होतील.