अनेकांची इच्छा असते की, आपले स्वतःचे एकतरी घर असावे. याच विचाराने अनेक जण अहोरात्र काबाडकष्ट करून पैसे जमा करतात आणि स्वतःचे घर खरेदी करतात. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या रकमेचे कर्ज काढून घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहण्याला बहुतांश लोकांची पसंती दिसते. मुळात घर खरेदी करावे की नाही यावर अनेकांची वेगवेगळी मते आहेत. यावर झेरोधा शेअर ट्रेडिंग कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामत (Nikhil Kamat, Co-Founder, Zerodha) यांनी स्वतःचे मत मांडले आहे. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
ब्रोकरेज फर्म झिरोधाचे (Zerodha) सहसंस्थापक निखिल कामत (Nikhil Kamat) यांनी गुरुवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशात गेल्या एका वर्षांमध्ये घराच्या भाड्यामध्ये प्रचंड प्रमाणत वाढ झाली आहे. भाडेकरू 3% पर्यंत घर भाडे भरत आहेत. मुळात गृहकर्ज हे 8 टक्क्यांहून अधिक आहे. पुढे निखिल कामत म्हणतात, मला जर विचारले की घर भाड्याने घ्यावे की खरेदी करावे, तर मी घर खरेदी करण्याला प्राधान्य देईन.
मागणीच्या तुलनेत पुरवठा नाही
कोविड महामारीनंतर शहरांमध्ये वाढलेल्या लोकसंख्येमुळे घरांच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शहरांमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा उपलब्ध नसल्याने घर भाड्याच्या किंमती वाढल्या आहेत. निखिल कामत यांनी ट्विटसोबत काही आकडे शेअर केले आहेत. ज्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार कोविड महामारीनंतर वाढलेल्या घराच्या मागणीत मेट्रो शहरांमध्ये पुरेसा हाऊसिंग सप्लाय उपलब्ध नाही.
सर्वाधिक घरभाडे बंगळुरुमध्ये
सध्या सर्वाधिक घरभाडे भराव्या लागणाऱ्या शहरात बंगळुरु शहराचा पहिला क्रमांक लागतो. बंगळुरुने मुंबई शहराला याबाबतीत मागे टाकले आहे. 2023 मध्ये येत्या काही महिन्यात बंगळुरुमधील प्रमुख भागात 5 ते 12% घर भाड्याच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. बंगळुरुमध्ये गेल्या एका वर्षात 1BHK च्या घर भाड्यात जवळपास 57% वाढ झाली आहे. हीच परिस्थिती बंगळुरुतील वेगवेगळ्या परिसरात पाहायला मिळत आहे. बंगळुरुमधील थानीसांद्रा मेन रोड आणि मराठागल्ली ORR परिसरात 1000 स्के. फुटाच्या फ्लॅट्सच्या भाड्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सरजापूर रोड परिसरात जवळपास 20% भाड्याच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबई- पुण्यात घरभाडे वाढले का?
मुंबई आणि पुण्यामध्ये छोट्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ग्राहक 1BHK घरांना भाड्याने खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. तसेच 1000 स्के. फुटाच्या फ्लॅट्सच्या भाड्यामध्ये मुंबई आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी वाढ झाली आहे. मुंबईत ही वाढ 13 % झाली असून पुण्यातील वाढ 20 % जास्त आहे. कोविड महामारीनंतर बऱ्याच लोकांनी मोठ्या प्रमाणावर या शहरांमध्ये स्थलांतर केल्याने ही परिस्थिती आल्याचे सांगितले जात आहे.
Source: hindi.moneycontrol.com