NFO Investment: नवी म्युच्युअल फंड हाऊसने इक्विटी प्रकारामध्ये एक नवीन एनएफओ आणला आहे. हा एनएफओ 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी ओपन झाला असून तो 1 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे.
नवी म्युच्युअल फंड हा एक ओपन एंडेड स्कीममधील इंडेक्स फंड आहे. याचे नाव Navi S&P BSE Sensex Index Fund आहे. त्यामुळे याचा बेंचमार्क इंडेक्स हा S&P BSE Sensex TRI आहे. गुंतवणूकदार या फंडमधून कधीही पैसे काढू शकतात. कंपनीच्या मते दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये गुंतवणूकदारांना अगदी माफक म्हणजे अवघ्या 10 रुपयांत गुंतवणूक करता येणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदार कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकतो.
एनएफओ म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हाऊसतर्फे गुंतवणुकदारांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ मिळावा, हा प्रयत्न सुरू असतो. त्याचाच एक भाग म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या स्कीम बाजारात आणतात. तेव्हा त्याला एनएफओ (New Fund Offer-NFO) म्हणतात. एखाद्या म्युच्युअल फंड हाऊसमध्ये विशिष्ट प्रकारची योजना अस्तित्वात नसेल तर ती एनएफओच्या (NFO) माध्यमातून बाजारात आणली जाते.
10 रुपयांत एसआयपी सुरू करा
नवी म्युच्युअल फंडाच्या या नवीन इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूकदार दररोज, आठवड्याने किंवा महिन्याने 10 रुपयांची एसआयपी सुरू करू शकतात. 10 रुपये ही किमान रक्कम आहे. तर कमाल रकमेची कोणतीही लिमिट नाही. तसेच या फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणताही एक्झिट किंवा इंट्री लोड द्यावा लागणार नाही.
लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय
नवी म्युच्युअल फंड हाऊसने एनएफओ जाहीर करताना दिलेल्या माहितीनुसार, लॉन्ग टर्म म्हणजे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही स्कीम फायदेशीर ठरू शकते. असा अंदाज व्यक्त केला आहे. याची हमी कोणच देत नाही. पण कंपनीला असा विश्वास आहे की, या योजनांतर्गत जमा होणारा निधी हा देशातील वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. दरम्यान, S&P BSE Sensex Index मध्ये मागील 3 वर्षांत जवळपास 19.97 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)