Nestle and Capital Foods Deal: अन्नपदार्थ निर्मितीमध्ये नेस्ले ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. शीतपेये, कॉफी, डेअरी उत्पादनांपासून इतरही हजारो खाद्यपदार्थ नेस्ले बनवते. कंपनीने भारताची बाजारपेठ काबीज केला आहे. नेस्लेची उत्पादने घराघरात पोहचली आहेत. स्वित्झर्लंडची नेस्ले आता भारतीय कॅपिटल फूड ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी बोलणी करत आहे. ही डील शेवटच्या टप्प्यात असून जर व्यवहार पूर्ण झाला तर कॅपिटल फूडकडील चिंग्ज सिक्रेट हा ब्रँड नेस्ले कंपनीच्या ताब्यात जाईल. विविध चायनीज सूप, मसाल्यांसह इतरही अनेक उत्पादने या कंपनीकडून तयार करण्यात येतात.
कॅपिटल फूड ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत नेस्ले ही कंपनी आघाडीवर आहे. भारतामध्ये पॅकेज्ड फूडचा खप दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न नेस्लेकडून होत आहे. (Nestle and Capital Foods Deal) कॅपिटल फूड कंपनी ताब्यात घेतल्यानंतर नेस्लेची भारतातील विक्री नव्या उच्चाकांवर पोहचेल. कॅपिटल फूड ही मुंबईतील खाद्यपदार्थ तयार करणारी कंपनी आहे.
किती कोटींची डील असू शकते?
कॅपिटल फूड विकत घेण्यासाठी कोणत्याही कंपनीला 100 कोटी डॉलर्स एवढी रक्कम मोजावी लागू शकते, अशी माहिती फायनान्शिअल एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या डीलमधील माहिती अद्याप बाहेर आली नसून येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
चिंग्ज सिक्रेट ब्रँड
चिंग्ज सिक्रेट हा ब्रँड भारतात मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहे. विविध चायनीज चटनी, नुडल्स, मसाले, सूप अशी उत्पादने कंपनीकडून बनवण्यात येतात. “देशी चायनीज फेलवर्स” या बॅनरखाली कंपनीकडून आपल्या विविध उत्पादनांची जाहीरात करण्यात येते. कॅपिटल फूड कंपनी विकत घेण्यासाठी इतरही कंपन्या इच्छुक आहेत. मात्र, नेस्ले सोबतची डील पूर्ण होईल, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
नेस्ले कंपनीचे शेअर्स मागील वर्षात 10 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीची बाजार मूल्य 22.3 बिलियन डॉलर इतके आहे. नेस्लेने भारतात 1961 साली पहिल्यांचा निर्मिती प्रकल्प सुरू केला होता. तर कॅपिटल फूड या कंपनीमध्ये जनरल अटलांटिक या संस्थेने गुंतवणूक केली आहे. दोन्हीही कंपन्यांकडून विक्री व्यवहारावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.