राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरांची घरपट्टी माफ केली जाण्याची शक्यता आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतील रहिवाशांना 500 फूटापर्यंत घरपट्टी माफ केली जाण्याची शक्यता आहे. जानेवारी 2022 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 500 फूटांची घरपट्टी माफ करण्याची घोषणा केली होती.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत देखील अशाच प्रकारची कर सवलत लागू करण्याचे संकेत दिले आहेत. नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांनी 500 चौरस फूटांच्या घरांना मालमत्ता कर माफी बाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.पालिका निवडणुकीपूर्वी सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेकडून यापूर्वीच असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. वर्ष 2019 मध्ये नवी मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव मंजुर केला होता.तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र तीन वर्षात यावर कोणताच निर्णय झाला नाही.
नवी मुंबई महापालिकेला घरपट्टीमधूल चांगला कर महसूल मिळतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नवी मुंबई महापालिकेने 633.17 कोटींचा कर गोळा केला होता.पालिकेच्या इतिहासात एका वर्षातले घरपट्टीचे हे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न आहे. एकाच महिन्यात 200 कोटींची घरपट्टी गोळा करण्यात आली होती. त्यामुळे 500 चौरस फूट मालमत्तांची घरपट्टी माफ केली तर पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी मोहीम देखील राबवली होती. 10 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या करदात्यांना नोटीस बजावण्यात आली होती. थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून काही प्रमाणात सवलत देण्यात आली. या योजनेतून 130 कोटींचा कर वसूल करण्यात आला.जवळपास 12000 करदात्यांचे 110 कोटींचे व्याज माफ करण्यात आले.
यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये घरपट्टीतून 558 कोटींचा महसूल मिळवला होता. वर्ष 2020-21 मध्ये घरपट्टीतून पालिकेला 526 कोटींचा महसूल मिळाला होता.
मुंबई पालिकेचे 500 कोटींचे उत्पन्न घटले
मुंबईत सरसकट 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात किमान 500 कोटींची घट झाली आहे. मुंबई महापालिका महसुलाच्याबाबतीत देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या महापालिकेला मालमत्ता करातून दरवर्षी 4000 ते 5000 कोटींचा महसूल मिळतो. मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ केल्याने शहर आणि उपनगरातील जवळपास 16 लाख प्रॉपर्टींना फायदा झाला होता.