म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 पासून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना इक्विटी फंडांची विक्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच (T+2) बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. यापूर्वी इक्विटी म्युच्युअल फंडांची विक्री केल्यानंतर गुंतवणूकदारांना पैशांसाठी तिसऱ्या दिवसापर्यंत (T+3) वाट पहावी लागत होती.
नुकताच शेअर मार्केटमध्ये ट्रेड सेटलमेंटचा कालावधी कमी करण्यात आल होता. त्याच धर्तीवर म्युच्युअल फंड कंपन्यांनी येत्या 1 फेब्रुवारी 2023 पासून ट्रेड सेटलमेंटचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून त्याच दिवशी संध्याकाळी फंड कंपन्यांकडून एनएव्ही (NAV) जारी करण्यात येईल. याचा अर्थ भारतात इक्विटी म्युच्युअल फंडांचा व्यवहार दुसऱ्याच दिवशी पूर्ण होणार आहे. अर्थात दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे जमा होतील.
इक्विटी मार्केटमध्ये T+1 सेटलमेंटची पद्धत लागू करणारा भारत हा जगातील पहिलाच देश असल्याचे आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडांचे सीईओ आणि अॅम्फीचे (AMFI) अध्यक्ष ए. बालासुब्रमण्यम यांनी सांगितले. अशाच प्रकारचा फायदा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मिळावा, यासाठी फंड कंपन्यांनी T+2 ट्रेड सेटलमेंट लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे बालासुब्रमण्यम यांनी सांगितले.
इक्विटी मार्केटसाठी सेबीकडून सुधारणा करण्यात येत आहेत. अॅम्फी आणि असेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून गुंतवणूकदारांच्या हिताला प्राधान्य देण्यात येत असल्याचे अॅम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस वेंकटेश यांनी सांगितले. अॅम्फी सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या म्युच्युअल फंड कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ही संस्था आहे. आजच्या घडीला 44 म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.