Top Billionaires in World: जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकासाठी जणूकाही संगीत खुर्ची सुरू आहे. काही दिवसांपूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलेले इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. मस्क यांनी एका दिवसापूर्वीच बर्नाड अनॉल्ट यांच्याकडून पहिल्या क्रमांक पटकावला होता. तर दुसरीकडे अदानी समुहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत होत असलेली घट पाहून ते कितव्या स्थानावर जातील. अशी चर्चा सुरू असताना ते मात्र ब्लूमबर्ग बिलिअन इंडेक्सच्या टॉप 30 मध्ये आलेले आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.
गौतम अदानी टॉप 30 मध्ये
ब्लूमबर्ग बिलिअन इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे आता 43.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 28 व्या क्रमांकावर आले आहेत. म्हणजे या अहवालानुसार ते टॉप 30 मध्ये आहेत. बुधवारी (दि. 1 मार्च) अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत बुधवारी 3.14 अब्ज डॉलरची भर पडल्याचे दिसून येते. हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी समुहाबाबत जाहीर केलेल्या अहवालामुळे अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत कमालीची घसरण झाली होती. ते यापूर्वी जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 5 मध्ये होते.
मुकेश अंबानी 11 व्या स्थानावर
रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी हे आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.पण त्यांना जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 10 मध्ये स्थान मिळालेले नाही. त्यांना अमेरिकेतील सर्गी ब्रिन यांनी मागे टाकले आहे. सर्गी ब्रिन यांचा टॉप 10 मध्ये समावेश झाल्याने मुकेश अंबानी हे टॉप 10 मधून आपोआप बाहेर पडले. सध्या मुकेश अंबानी हे 80.6 अब्ज डॉलरसह 11 व्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या क्रमांकावर बर्नाड अनॉल्ट
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवल्यानंतर अवघ्या काही कालावधीतच इलॉन मस्कचा पहिला क्रमांक बर्नाड अनॉल्ट यांनी हिसकावून घेतला आहे. बर्नाड हे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याजवळ सुमारे 186 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. बुधवारी (दि. 1 मार्च) त्यांच्या संपत्तीत 1.99 अब्ज डॉलरची भर पडली आणि ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले. तर इलॉन मस्क यांची संपत्ती 1.91 अब्ज डॉलरने कमी झाली होती. इलॉन मस्क यांच्याजवळ आता 184 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.