कृषीप्रधान भारतात खरं तर शेतकऱ्यांची (Farmers) अवस्था फारशी चांगली नाही. पिकांना भाव नसल्यानं शेतकऱ्याला बहुतांशवेळा तोटाच सहन करावा लागतो. सरकारी योजना (Government schemes) असल्या तरी त्या सर्वच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत:च्याच स्तरावर या सर्व बाबींशी झगडावं लागतं. शेतीचे नवनवे प्रयोग केले जातात. एखादं चांगलं उत्पन्न देणारं पीक (Crop) लावल्यास शेतकऱ्याची चांगली कमाई होऊ शकते. असंच एक पीक म्हणजे मशरूम (Mashroom). पारंपरिक पिकांऐवजी अधिक फायदेशीर असणाऱ्या या पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय.
Table of contents [Show]
मशरूम वाण - एनपीएस 5
कृषी शास्त्रज्ञांनी आता मशरूमचं एक नवंच वाण विकसित केलंय. याचं वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर खराब होत नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढविण्यासही हातभार लावतं. जम्मू आणि काश्मीरच्या कृषी विभागानं मशरूम शेतीच्या एनपीएस 5 (NPS-5) वाणाची यशस्वी चाचणी केली. यानंतर या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक लागवडीसाठी ते बाजारात उपलब्ध होणार आहे. हे नवं वाण अत्यंत प्रतिरोधक आहे आणि लवकरच खराब होणार नाही, ही याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. काश्मीर ऑब्झर्व्हरनं हे वृत्त दिलंय.
J&K Govt To Introduce New Variety Of NPS-5 #Mushroom In Sep https://t.co/WKGVwzE1NC #KashmirObserver via @kashmirobserver
— Kashmir Observer™ (@kashmirobserver) April 21, 2023
कोणतं वाण?
मशरूमच्या नव्या वाणाविषयी कृषी विभागानं माहिती दिली. संचालक के. के. शर्मा यांनी सांगितलं, की आमची मशरूमची एनपीएस 5 हे दुसरं वाण आहे. त्यावर सखोल असा अभ्यास कृषी विभागानं केलाय. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना या नव्या बियाण्यांचं वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भातल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याची महत्त्वाची माहितीदेखील त्यांनी दिली.
वैशिष्ट्ये काय?
मशरूमचं हे नवं वाण एनपीए 5 कमी पाणी, जास्त पाण्याची परिस्थिती आणि कार्बन डायऑक्साइडच्या जास्त प्रमाणातल्या सांद्रतेमुळे प्रभावित होत नाही. विकायला उशीर झाला, एक-दोन दिवस विकलं गेलं नाही तर बाजारातले बहुतांश मशरूम शिळे होतात. हे वाण मात्र लवकर खराब होत नाही. या मशरूमच्या नवीन जातीच्या बाबतीत असं काहीही होत नाही, जे पारंपरिक मशरूमच्या बाबतीत घडतं. यातल्या चांगल्या गुणवत्तेमुळे त्याचं बाजारमूल्यदेखील वाढणार आहे आणि शेवटी शेतकऱ्याला अधिक कमाईची संधी मिळणार आहे.
मशरूमच्या क्षेत्राचा विकास करण्याचं उद्दिष्ट
कृषी विभागामार्फत जम्मू आणि काश्मीर राज्यात मशरूमच्या क्षेत्राचा विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. त्या अनुषंगानं विविध पातळ्यांवर संशोधन आणि कामानं वेग घेतलाय. त्याचाच हा एक भाग आहे. मशरूम त्याच्या शेल्फ लाइफच्या दरम्यान तपकिरी रंगाचा होतो. असं झाल्यास त्याचं बाजार मूल्य कमी होतं. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. हा विचार करूनच अधिक टिकाऊ असं हे वाण शेतकऱ्यांसाठी आणलंय, असं कृषी विभागानं स्पष्ट केलं.
विविध राज्यांत मोठी मागणी
मागच्या काही वर्षांपासून मशरूम्सना मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. मोठी शहरं यात दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई ही राजधानीची, मेट्रो शहरं तर आहेतच मात्र याशिवाय इतर शहरांतूनही याला मागणी आहे. तामिळनाडू आणि ओडिशा राज्यात तर ठिकठिकाणी याची विक्री होत असते. त्यासोबतच कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, गुजरात, राजस्थान अशा राज्यांत याला चांगली मागणी आहे.