Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असण्यासोबत एक ऐतिहासिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. मुंबईत देशा-विदेशातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. या पर्यटकांना आणि मुंबईकरांना आता मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील(CSMT) पुरातन वारसा वस्तू संग्रहालय अवघ्या 50 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मध्य रेल्वेने या संग्रहालयाच्या तिकिटाचे दर कमी केले आहेत. यापूर्वी पर्यटकांना 200 रुपये तिकीट दर आकारले जात होते. मात्र आता 30 जानेवारीपासून तिकीट दर 50 रुपये करण्यात आला येणार आहे. त्यामुळे तुम्हीही अजूनपर्यंत हे वस्तुसंग्रहालय पाहिले नसेल तर नक्कीच त्याला भेट द्या.
का बदलले तिकिटाचे दर?
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संग्रहालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2022 रोजी हे संग्रहालय पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. दिवसाला किमान 12 पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात. या संग्रहालयात येणाऱ्या प्रौढांसाठी 200 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये तिकीट दर आकारण्यात येतो. तिकिटांचे दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी सतत पर्यटकांकडून करण्यात येत होती. शेवटी तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवे तिकीट दर 30 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार(Shivaji Sutar) यांनी दिली आहे. प्रौढासाठी 50 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 20 रुपये तिकीट दर यापुढे आकारले जाणार आहेत.
या संग्रहालयात काय आहे?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) मध्ये पुरातन वारसा वस्तू संग्रहालय असून रेल्वेतील विविध वस्तूंचा ठेवा या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. तसेच बोरिबंदर ते ठाणे दरम्यान धावलेली पहिली रेल्वे आणि रेल्वेशी संबंधित अन्य महत्त्वपूर्ण माहितीचा खजिना या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे. मोठ्या उत्सूकतेने पर्यटक या संग्रहालयाला भेट देत असतात.