मुंबई (Mumbai) बरोबरच दिल्ली (New Delhi), गुरगाव (Gurugram) आणि नॉयडामध्ये (Noida) घर आलिशन घरांची (Premium Houses) मागणी 2022 मध्ये वाढलेली होती. सॅवील्स इंडिया (Saville's India) या कंपनीने तसा अहवाल सादर केला आहे. खरंतर अलीकडे रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) कर्जावरच्या व्याजदरात वाढ केली आहे. पण, हा कल असतानाही लोकांची पसंती आलिशान घरांना होती, असं या अहवालातून दिसतं आहे.
इतकंच नाही तर कोव्हिडच्या काळातली वर्क-फॉम-होम सुविधा अनेक कंपन्यांमध्ये बंद झाल्यामुळे लोकांचा कामाच्या जागी घर भाड्याने घेण्याचा कलही वाढला आहे. पण, तरीही लोकांचा कल अनेक प्रकारच्या सोयी सुविधा असलेल्या प्रकल्पांमध्येच घरं घेण्याचा आहे. भाड्याच्या घरासाठीही अशाच गृह प्रकल्पांना मागणी आहे.
त्याचबरोबर बांधून तयार असलेल्या घरांऐवजी बांधकाम सुरू असलेल्या घरांना मागणी आहे.
त्याचा परिणाम घरांच्या किमतींवरही जाणवतोय. म्हणजे बांधून तयार घरांवरच्या किमती मागच्या वर्षभरात 1% ने वाढल्यात. पण, बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या किमती याच कालावधीत 3% नी वाढल्या आहेत.
‘मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली या महानगरांमध्ये आलिशान घरांच्या किमती वाढल्या आहेत. आणि त्यांना मागणीही आहे. हीच मागणी 2023 साली पहिल्या दोन तिमाहींमध्ये कायम राहील, असा अंदाज आहे. लोक आता मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठीही रिअल इस्टेटकडे बघतायत,’ असं सॅविल्स रिसर्च संस्थेनं आपल्या संशोधन अहवालात म्हटलं आहे.
अहवालातून समोर आलेले निष्कर्ष
या अहवालातून साधारणपणे घर खरेदीचा लोकांमध्ये असलेला ट्रेंड दिसून येतो. त्यानुसार काही महत्त्वाचे निष्कर्ष आपल्याला काढता येतील.
- महानगरांमध्ये लोकांची पसंती आलिशान म्हणजे मोठ्या आणि सुविधायुक्त घरांना आहे
- घर भाड्याने घेण्याचं प्रमाण शहरांमध्ये वाढतंय
- लोक अजूनही रिअल इस्टेटकडे गुंतवणुकीचं साधन म्हणून पाहात आहेत
- तयार घरांपेक्षा बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये तिथल्या सुविधा पाहून लोक बुकिंग करत आहेत