बऱ्याच शेतकऱ्यांची शेती या पावसावर अवलंबून असते. त्यातही ज्या भागात पाऊस कमी पडतो. त्या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेपुरतं देखील उत्पन्न होत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन, सरकारने 'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना' सुरु केली आहे. यामुळे कमी पाऊस पडणाऱ्या भागात पिकांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करुन दिली जाते. केवळ पावसावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधनांमार्फत पाणी आणून, पिकांना पाणी दिल्यास, शाश्वत उत्पन्न घेता येते. यामध्ये ठिंबक आणि तुषार सिंचन शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायी ठरते.
या योजनेचा उद्देश काय ?
कमी पाण्याचा वापर करुन, शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे. उपलब्ध पाण्याचा पूरेपूर वापर शेतकऱ्याला शेतीसाठी करता यावा, यासाठी सिंचन योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
किती अनुदान दिले जाते ?
ठिंबक आणि तुषार संच बसवण्यासाठी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान राष्ट्रीय विकास योजनअंतर्गत आणि 25 टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत असे 80 टक्के एकूण अनुदान दिले जाते. तसेच बहूभूधारक शेतकऱ्यांना अनुक्रमे 45 टक्के आणि 30 टक्के असे एकूण 75 टक्के अनुदान दिले जाते.
या योजनेची वैशिष्ट्ये काय?
- या योजनेसाठी महाडिबीटी संकेतस्थळावरुन अर्ज केल्या जातो.
- अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.
- या योजनेअंतर्गत 5 हेक्टरपर्यंत लाभ मर्यादा मिळते.
- आधार जोडणी असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते.
- सर्व पिकांसाठी अनुदान दिल्या जाते.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.
- तसेच, अनुसूचित जाती आणि नवबौध्द शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिल्या जाते.