India's Richers Person: 2022 मध्ये अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे 3 लाख कोटी रुपयांच्या फरकाने मुकेश अंबानीपेक्षा पुढे होते. त्यावेळी ते सर्वांत श्रीमंत भारतीय म्हणून पहिल्या क्रमांकावर होते. तर यावर्षी म्हणजे 2023 मध्ये मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांना 3.3 लाख कोटी रुपयांनी मागे टाकत पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची या वर्षातील संपत्ती जवळपास 8.08 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. आज (दि. 10 ऑक्टोबर) भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 8.08 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह मुकेश अंबानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 4.74 लाख कोटी इतकी आहे.
मुकेश अंबानींच्या नफ्यात 2 टक्क्यांनी वाढ
भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या याच यादीत मागील वर्षी गौतम अदानी हे पहिल्या क्रमांकावर होते. पण मागील वर्षभरात मुकेश अंबानी यांच्या नफ्यात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हारून इंडिया रिच लिस्ट 2023 (Haroon India Rich List 2023) च्या अहवालानुसार, अदानी समुहातील अदानी फॉर्च्युन (Adani Fortune) या कंपनीच्या संपत्तीत जवळपास 57 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यात मागे हिंडेनबर्गने अदानी समुहाच्या व्यवहार प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही लक्षणीय घट पाहायला मिळाली होती.
तिसऱ्या क्रमांकावर सायर पुनावाला
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकानंतर सायरस पुनावाला हे 2.78 लाख कोटी संपत्तीसह तिसरे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये पुनावाल यांच्या संपत्तीत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांना या वर्षात एकूण 73 हजार 100 कोटींचा नफा झाला आहे.
चौथ्या स्थानावर एचसीएल टेक्नॉलॉजीचे (HCL Technology) संस्थापक शिव नाडर हे असून त्यांची या वर्षातील संपत्ती 2.28 लाख कोटी रुपये आहे. तर हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा या 1.76 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंत भारतीयांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. या वर्षभरात नाडर आणि हिंदुजा यांच्या संपत्तीत अनुक्रमे 23 आणि 7 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते.
श्रीमंताच्या यादीत 52 रिअल इस्टेट डेव्हलपर
हारुन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एकूण 1,319 जणांच्या भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 52 रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्ती आहेत. यामध्ये डीएलएफचे राजीव सिंग (DLF'S Rajiv Singh) रिअल इस्टेट सेक्टरमधून सर्वांत श्रीमंत ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 78,900 कोटी इतकी आहे. त्यांच्यानंतर मंगलप्रभात लोढा हे 52,800 कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर के रहेजा ग्रुपचे चंद्रू रहेजा हे 45,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह रिअल इस्टेट सेक्टरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.