राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आरामदायी प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी सातत्याने एसटीच्या ताफ्यात अत्याधुनिक आरामदायी बसचा समावेश करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. विठाई, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, आता ई शिवाई या सारख्या एसी बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात उपलब्ध आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाने प्रवशांना कमी खर्चात प्रवासाची सेवा देण्यासाठी जन शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. आज आपण एसटी महामंडळाच्या जन शिवनेरी योजनेबाबत जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक असेल शिवनेरी बस
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही आणि शिवनेरी बसची सेवा खुप लोकप्रिय ठरली आहे. सध्या शिवशाहीची सेवा बंद करण्यात असली तरीही एसटी महामंडळाने आता मुंबई-पुणे महामार्गावर धावनारी 'शिवनेरी' बसची सेवा राज्यातील इतरही महत्त्वाच्या महामार्गावर सुरू करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या बसेस पर्यावरणपुरक म्हणजेच इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असून त्या ई शिवनेरी म्हणून ओळखल्या जातील. तसेच यासाठी तिकिटाचा दरही शिवनेरी पेक्षा कमी म्हणजे शिवशाही बसच्या तिकीट दरा इतका ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
100 जन-शिवनेरी धावणार-
राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच 'ई-शिवनेरी' बसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच या बस राज्यात जन शिवनेरी म्हणून ओळखल्या जातील. सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर 10 जुलैपासून नाशिक-पुणे या महामार्गावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात तब्बल 100 ई-शिवनेरी (जन शिवनेरी) राज्यातील विविध रस्त्यांवर धावताना दिसतील.
जन शिवनेरीचा स्वस्तात प्रवास
एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सर्व शिवनेरी या इलेक्ट्रिक बसेस आहेत. त्यामुळे या बसच्या इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. परिणामी जन शिवनेरीसाठी आकारण्यात येणाऱ्या तिकीट दरामध्येही कपात करण्यात येणार आहे. शिवनेरी बसचे तिकीट दर 2.80 रुपये प्रति किमी आहे. तर आता 'जन शिवनेरी' साठी 2 रुपये प्रति किमी आकारण्यात येत आहे. हा तिकीट दर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या शिवशाही बसच्या तिकीट दरा इतका राहणार आहे.