ग्रामीण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक वाहतुकीचा आधारस्तंभ असणाऱ्या एसटी महामंडाळाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी एसटीने सामान्य प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देत अनेक उपक्रम राबवले आहेत.राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली महिलाांसाठी प्रवासी भाड्यात सरसकट 50% सवलतीची योजना लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत दोन महिन्यात 10 कोटींहून अधिक महिलांनी प्रवास केला असून त्यांची सुमारे 300 कोटींची बचत झाली आहे.
एसटी महामंडळाच्या दररोजच्या प्रवाशी संख्येत देखील वाढ झाली असून दररोज 55 लाख महिला प्रवासी योजनेचा लाभ घेत असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने महामनीशी बोलताना सांगितले."बहुजन हिताय बहुजन सुखाय" या ब्रिद वाक्याला अनुसरुन एसटी महामंडळाने मागील 75 वर्षात खेडोपाडी सेवा दिली आहे. महामंडळाकडून समाजातील विविध घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलती दिल्या जातात.
मार्च महिन्यात जाही करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50% सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.17 मार्च 2023 पासून सुरु झालेल्या महिला सन्मान योजनेत साध्या एसटीपासून ई-शिवनेरी या सर्वच प्रकारच्या बसमध्ये महिलांना 50% सवलत देण्यात आली आहे.
निम्म्या तिकीट दराने प्रवास करता येत असल्याने महिला वर्गाला आर्थिक फायदा झाला आहे. महिलांचा दैनंदिन प्रवास वाढला आहे. ज्याचा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे. एकूण प्रवाशी संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.प्रवास स्वस्त झाल्याने महिला या योजनेला चांगला प्रतिसाद देत आहेत.दिवसेंदिवस महिला प्रवाशांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील एसटीने प्रवास करू लागल्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या हाऊसफुल्ल होत आहेत. या योजनेच्या माध्यमातून दररोज सरासरी 55 लाख महिला सवलतीच्या दरात प्रवास करीत आहेत.
आतापर्यंत 10 कोटी 50 लाख महिला प्रवाशांनी 50% प्रवासी तिकीट सवलत घेऊन प्रवास केला आहे.या योजनेमुळे दैनंदिन प्रवासी संख्येतसुद्धा जवळपास 10% वाढ झाली. महिला सन्मान योजनेमुळे आतापर्यंत महिलांची तिकीट दरातील बचत 300 कोटी रुपये झाली आहे.या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला दिली जाणार आहे.
एसटीकडून 18 लाख विद्यार्थिनींना मोफत प्रवास
अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित आणि मोफत प्रवास एसटीने केला जातो. राज्यभरात जवळपास 18 विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत आहेत.विशेषतःग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा मुख्य आधार एसटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत एसटी मोठे योगदान देत आहे.