Motilal Oswal Charity: मोतीलाल ओसवाल कंपनीच्या प्रमोटर्सनी सार्वजनिक हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीतील 10% समभाग समाजोपयोगी कामांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मोतीलाल ओसवाल आणि त्यांचे सहकारी रामदेव अगरवाल हे दोघे मिळून प्रत्येकी 5% शेअर्स दान करणार आहेत. या शेअर्सचे एकूण मूल्य 1200 कोटींपेक्षा जास्त आहे.
चॅरिटेबल कामांसाठी दोघे प्रमोटर्स मिळून 10% शेअर्स देणार आहेत. पुढील 10 वर्षात ही रक्कम विविध कामांवर खर्च केली जाईल. सामाजिक दायित्व आणि भान राखून समाजात सकारात्मक बदल आणण्यासाठी दोन्ही प्रमोटर्सने मिळून 10 टक्के इक्विटी दान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी अधिकृत माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने दिले आहे. कंपनीचे प्रमोटर्स आणि सहकार्यांकडे सुमारे 70% समभाग आहेत.
दीड कोटींच्या शेअर्स ची देणगी
मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल प्रत्येकी 73.97 लाख म्हणजेच सुमारे दीड कोटी शेअर्स देणार आहेत. या शेअर्सचे एकूण मूल्य 1240 कोटी रुपये आहे. "मी देवाचे आभार मानतो. मी अनेक शाळा, महाविद्यालये आणि होस्टेल्समध्ये राहिलोय शिकलोय जी काही दानशूर व्यक्तींनी उभारली आहेत. आता समाजाला माघारी देऊन मी कृतज्ञता व्यक्त करत आहे, असे मोतीलाल ओसवाल यांनी म्हटले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल कंपनीबद्दल
मोतीलाल ओसवाल ही देशातील प्रमुख तीन ब्रोकरेज फर्मपैकी एक आहे. 1.25 लाख कोटींपेक्षा जास्त अॅसेट कंपनीकडून व्यवस्थापित केली जाते. जून तिमाहित एकूण महसूल 1264 कोटी रुपये आहे. मागील वर्षीपेक्षा यात 32% वाढ झाली आहे. तसेच कर वजा केल्यानंतर नफा 240 कोटी रुपये झाला. रिटेल, ब्रोकिंग, इक्विटी, इन्वेस्टमेंट बँकिंग व्यवसायातून महसूल 44 टक्क्यांनी वाढला आहे.