जगभरात भारताला ओळख नवी ओळख करुन देणाऱ्या टॉप 75 कंपन्यांच्या ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये वर्ष 2022 मध्ये 35% वाढ झाली आहे. कोरोनानंतर या कंपन्यांच्या एकूण मूल्यात झालेली वाढ अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. कंतार ब्रॅंडझेडच्या ताज्या अहवालात 75 ब्रॅंड्समध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी अव्वल ठरली आहे.टीसीएसची ब्रॅंड व्हॅल्यू 45.5 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
'कंतार ब्रॅंडझेड'च्या (Kantar BrandZ) टॉप 75 ब्रॅंड्सच्या अहवालात दुसऱ्या स्थानावर एचडीएफसी बँक आहे. एचडीएफसी बँकेची ब्रॅंड व्हॅल्यू 32.7 बिलियन डॉलर्स इतकी आहे. यापूर्वी एचडीएफसी बँक देशातील अव्वल ब्रॅंड होता. कोरोना संकटकाळात जागतिक पातळीवर ऑटोमेशन आणि डिजिटल सेवांची मागणी वाढल्याचा फायदा टीसीएसला झाला. चालू वर्षात टीसीएसच्या ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
वर्षभरात इन्फोसिस या कंपनीने 12 व्या क्रमांकावर 3 क्रमांकावर झेप घेतली आहे. इन्फोसिसची ब्रॅंड व्हॅल्यू 29.2 बिलियन डॉलर इतकी आहे. एअरटेल चौथ्या स्थानावर असून कंपनीची ब्रँड व्हॅल्यू 17.4 बिलियन डॉलर आहे. पाचव्या स्थानी एशियन पेंट्स 15.3 बिलियन डॉलर, भारतीय स्टेट बँक 13.6 बिलियन डॉलरसह सहाव्या स्थानावर, एलआयसी 22.3 बिलियन डॉलरसह सातव्या स्थानावर आहे. आठव्या स्थानी कोटक महिद्रा बँक असून त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 11.9 बिलियन डॉलर आहे. नवव्या स्थानी आयसीआयसीआय बँक असून त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 11 बिलियन डॉलर आहे. दहाव्या स्थानी जिओ असून त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 10.7 बिलियन डॉलर आहे.
सर्वच 75 ब्रॅंडचे एकूण मूल्य तब्बल 393 बिलियन डॉलर्स असून हे प्रमाण जीडीपीच्या तुलनेत 11% इतके आहे. 75 पैकी 57 ब्रॅंड 2018 पासून या यादीत आहेत. ऑगस्ट 2014 ते जून 2022 या काळात या सेन्सेक्स निर्देशांकात 63.8% वाढ झाली होती तर याच काळात या 75 ब्रॅंड्सचा पोर्टफोलिओ 81.8% ने वाढला असल्याचे 'कंतार ब्रॅंडझेड'अहवालात म्हटले आहे. टॉप 75 ब्रॅंड्समध्ये 11 कन्झुमर टेक ब्रॅंड आहेत. त्यात फ्लिपकार्ट, Byju’s, स्वीगी आणि नायका या ब्रॅंड्सचा समावेश आहे. यंदा टॉप 75 ब्रॅंड्समध्ये Byju’s आणि अदानी गॅस आणि Vi या ब्रॅंड्सचा समावेश झाला.