केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगढ येथे झालेल्या 47 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत (GST Council Meet) प्री-पॅक खाद्यपदार्थांसह मासे, दही, पनीर आदी पदार्थांवर जीएसटी (GST) आकारला जाणार आहे.
जीएसटी कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन महागाईच्या काळात कात्री बसणार आहे. या परिषदेत प्री-पॅक, अनपॅक न केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी (GST) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 18 जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती महसूल सचिव तरूण बजाज यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
जाणून घेऊयात कोणत्या वस्तूंची किंमत वाढणार आहे
• एका दिवसाचे 1 हजार रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेलच्या रूम रेटवर 12 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
• हॉस्पिटलमधील रूमचे भाडे 5 हजार रूपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार.
• फ्रोझन फिश, दही, पनीर, लस्सी, मध, कोरडे सोयाबीन आणि सुका मखना यावर 5 टक्के जीएसटी लागू होणार आहे.
• चेक जारी करताना बँकेकडून आता 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे.
• सुरी, पेपर कटिंग नाइफ आणि शार्पनर, एलईडी दिवे, ड्रॉईंग आणि मार्किंग उत्पादनांवर 18 टक्क्यांपर्यंत जीएसटी वाढवण्यात आला आहे.
• सोलर वॉटर हिटरवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून आता 12 टक्के करण्यात आला आहे.
• माल व प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तसेच शस्त्रक्रियेशी संबंधित उपकरणांवरील जीएसटी 12 वरून 5 टक्के कमी करण्यात आला आहे.
• ट्रक आणि वाहनांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करणार आहे.
                
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            