बाजारात अलिकडच्या काळात नेहमीच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार (Investor) म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवण्यास प्राधान्य देताहेत. इक्विटी म्युच्युअल फंडांत (Equity mutual funds) मार्चमध्ये या वर्षी सलग तिसऱ्या महिन्यात गुंतवणूक झाली. मार्च 2023मध्ये इक्विटी फंडांमध्ये एकूण 20534.21 कोटी रुपये इतकी विक्रमी गुंतवणूक झालेली पाहायला मिळाली. इक्विटी प्रकारात, सर्वात जास्त गुंतवणूकदार 3928.97 कोटी रुपयांसह सेक्टरल फंडांमध्ये दिसले. या वर्षी सलग तिसऱ्या महिन्यात गुंतवणूकदारांनी फ्लेक्सी कॅप फंड या प्रकारामध्ये मोठी खरेदी केली. गेल्या महिन्यात या फंडांमध्ये 1,107 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. महिन्याला 10,000 रुपयांच्या एसआयपीसह (Systematic Investment Plan) 5 वर्षांत 11 लाखांपेक्षा जास्त निधी या माध्यमातून तयार करण्यात आलाय. या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 25 टक्के वार्षिक परतावा मिळत असल्याचं दिसून आलंय. असा हा एकूण फ्लेक्सी कॅप फंडांचा परफॉर्मन्स आहे.
Table of contents [Show]
टॉप 3 फ्लेक्सी मिड कॅप फंड
1. क्वांट फ्लेक्सी कॅप फंड
क्वांट फ्लेक्सी फंडाचा एसआयपी परतावा गेल्या 5 वर्षात दरवर्षी 25.22 टक्के इतका आहे. या योजनेत महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक फायद्याची आहे. साधारणपणे 5 वर्षांत 11.18 लाख रुपये या माध्यमातून जमा झाले. महत्त्वाचं म्हणजे या योजनेत किमान गुंतवणूक 5,000 रुपये करता येवू शकते. तर किमान एसआयपी 1,000 रुपये आहे.
2. एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड इक्विटी प्लॅन
एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड इक्विटी प्लॅन हा एक उत्तम फ्लेक्सी कॅप फंड आहे. याचा एसआयपी रिटर्न मागच्या 5 वर्षांत दरवर्षी 20.36 टक्के इतका आहे. या योजनेत महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक करताना 5 वर्षांत 9.95 लाख रुपयांपर्यंत वाढलीय. या योजनेतली किमान गुंतवणूक 100 रुपये आहे. तर किमान एसआयपी 100 आहे.
3. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड
पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड या योजनेचा एसआयपी परतावा मागच्या 5 वर्षांत दरवर्षी 19.65 टक्के इतका राहिला आहे. या योजनेत महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक 5 वर्षात 9.77 लाख रुपये इतकी झाली. यातली किमान गुंतवणूक 1,000 असून किमान एसआयपी 1,000 रुपये आहे. (टीप : या फंडाची एनएव्ही 13 एप्रिल 2023च्या मूल्य संशोधनानुसार आहे.)
काय आहे फ्लेक्सी कॅप्स?
फ्लेक्सी कॅप फंड हा म्युच्युअल फंडांचाच एक प्रकार आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देणं, हाच फ्लेक्सी कॅप फंडाचा उद्देश असतो. यासाठी फंड मॅनेजर कंपनीचे कोणत्याची प्रकारातले शेअर्स निवडू शकतो. त्याला त्याचं स्वातंत्र्य असतं. त्याच्यासमोर विशिष्ट बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांची सक्ती नसते. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यास यामुळे मदत मिळते. लार्ज कॅप फंडानंतर मिड कॅप हा दुसरा मोठा इक्विटी म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे. महागाईवर मात करण्याची क्षमता तर यात आहेच शिवाय चांगला परतावादेखील यामुळे मिळतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) ताज्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये (मार्च 2023) फ्लेक्सी कॅप फंडात 1107 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याआधी फेब्रुवारीमध्ये फ्लेक्सी कॅपमध्ये 1,802 कोटी आणि जानेवारीत 1,005.62 कोटींची गुंतवणूक झाली होती.
(टीप : म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही बाजारातल्या जोखमींच्या अधीन असते. महामनी अशा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)