पैशांबाबतचे निर्णय हे अत्यंत विचारपूर्वक आणि सखोल चौकशी करून घ्यायचे असतात. घरामध्ये आई-वडीलांनी घेतलेले आर्थिक निर्णय तुम्ही लहानपणापासून पाहत आलेलेच असाल. यातील काही निर्णयांमुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचंही अनेकांनी पाहिलं असेल.
अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीमुळे नातेवाईकांकडून घेतलेली विमा पॉलिसी, चैन मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून कष्टाने कमावलेला पैसा बुडाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. आर्थिक साक्षरता नसेल तर अशा चुका होणारच. आपल्या पालकांनी ज्या चुका केल्या तशाच आर्थिक चुका आताचे तरुणही करत आहेत. मात्र, फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.
आता जनरेशन झेड, वाय, मिलेनियल्स या नावांनी ओळखली जाणारी यंग जनरेशन आर्थिक निर्णय घेताना चुकत आहे. यातील काही नुकतेच नोकरीला लागले असून पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे याचे ज्ञान त्यांच्याकडे नाही. या लेखात पाहूया यंग जनरेशन मनी ट्रॅपमध्ये अडकण्यापासून कशी वाचू शकते. कोणत्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पैसे खर्च करण्यासाठी कंपन्या, बँका, ब्रँड्सकडून अनेक अमिषं दाखवण्यात येतात. त्याला अनेकजण फसतात.
इंटरनेट, सोशल मीडिया आणि मोबाईल अॅप्स आधारित सेवांमुळे तर पैशांच्या वापर आपण कसा करतो, यावर नियंत्रणच राहिले नाही. गरज नसलेले सबस्क्रिप्शन प्लॅन्स, डिस्काउंट ऑन शॉपिंग, झिरो कॉस्ट इएमआय, बाय नाऊ पे लेटर यारखे पर्याय तुमच्या खिशातून पैसे काढायचे मार्गच आहेत. ही फक्त काही उदहारणे आहेत. असे अनेक पर्याय आहेत, ज्यांना भुलून आपण कष्टाने कमावलेला पैसा वाया घालवतो. गरजेच्या गोष्टींसाठी जरुर पैसे खर्च करावेत. मात्र, ज्या गोष्टींची गरज नाही त्यांच्यापासून दूर रहावे.
सोशल मीडियाचा परिणाम - (Impact of Social Media)
तरुण वर्ग सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या अॅप्सवर तरुण हमखास असतात. या माध्यमांवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते हे तरुण मुलामुलींच्या लक्षात येत नाही. कंपन्यांकडून इन्फ्लुएन्सर्सद्वारे अनेक वस्तू आणि सेवांचे प्रमोशन केले जाते. त्यास तरुण फसतात. फक्त इन्फ्लुएन्सर्सने सांगितले, त्याने प्रमोट केले म्हणून एखादी वस्तू चांगली नसते. मात्र, तरीही त्यावर पैसे खर्च केले जातात.
याच प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीविषयी सल्ले देणारेही भरपूर आहेत. ट्विटर, इन्स्टाग्राम फीड अशा जाहिरातींनी भरून गेले आहे. इनव्हेस्टमेंट, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, स्टॉक्स टिप्स दिल्या जातात. या माहितीवर विश्वास ठेवू नका. याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. याचा अर्थ सोशल मीडिवरील सर्वच फेक असते असे नाही. मात्र, नीट चौकशी करून, सखोल अभ्यास करून एखादी वस्तू खरेदी करावी किंवा निर्णय घ्यावा.
झटपट कर्ज सुविधा (Instant loan Facility)
सध्या बाजारात झटपट कर्ज देणाऱ्या अनेक फायनान्शिअल संस्था, फिनटेक कंपन्या आल्या आहेत. विविध अॅप्सच्या आधारे काही मिनिटांत कर्ज मिळवून देण्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो. मात्र, कर्ज देताना नियमांचे पालन केले जात नाही. पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी क्रेडिट स्कोर नियम या अॅप्सकडून शिथिल करण्यात येतात.
हे कर्ज घेत असताना झिरो प्रोसेसिंग फी, कमी कागदपत्रांमध्ये लवकर कर्ज देण्याचा दावा केला जातो. त्यांच्याकडून कर्ज मिळतेही. मात्र, नंतर या अॅप्सद्वारे कर्जदाराला त्रास देण्यास सुरुवात होते. छुपे शुल्क, भरमसाठ व्याजदर कर्जाचे हप्ते चुकले तर दंड आकारला जातो. नुकतेच सरकारने अशा काही अॅप्सवर बंदीही घातली होती. या अॅप्सद्वारे कर्जदाराच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यताही आहे.
क्विक लोन देणाऱ्या अॅप्स द्वारे, बाय नाऊ पे लेटर, ट्रॅव्हल नाऊ पे लेटर सोबतच मॅरी नाऊ पे लेटर सारख्या सुविधा देण्यात येतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कागदपत्रे आणि नियमांचेही पालन होत नाही. एका अहवालानुसार, पारंपरिक कर्ज सुविधेला डिजिटल कर्ज फॅसिलिटी 2030 पर्यंत मागे टाकेल, असे म्हटले आहे. लाइफस्टाइल मेंटेन ठेवण्यासाठी तरुणांकडून असे कर्ज घेतले जाते. मात्र, नंतर त्याची सवय लागते. सुरुवातीला कमी रकमेचे कर्ज घेतल्यानंतर नंतर हळुहळू जास्त रकमेचे कर्ज घेतले जाते. क्रेडिट कार्डचा अति वापरही पैसे जास्त खर्च होण्यास कारणीभूत आहे.
ऑनलाइन फॅन्टसी ट्रेडिंग गेम्स (Online Fantasy Trading games)
फॅन्टसी ऑनलाइन गेमिंगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हर्च्युअल एन्वायरमेंटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केले जाते. अर्थात ही खरीखुरी ट्रेडिंग नाही. मात्र, यातून आत्मविश्वास वाढतो. जर व्हर्च्युअल ट्रेडिंगमध्ये यश मिळतेय असे दिसले तर त्याचा परिणाम नंतर शेअर मार्केटमध्ये पैसे लावताना होऊ शकतो. या गेमिंग प्लॅटफॉर्म्सने अनेक टुल्स आणि सॉफ्टवेअर तयार केले आहेत, त्याद्वारे व्हर्च्युअल ट्रेडिंग करता येते. मात्र, गेमिंगमधील ट्रेडिंग आणि खरीखुरी ट्रेडिंग यात खूप फरक आहे.
नीट अभ्यास केल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नयेत. कोणीतरी सांगितले म्हणून अमुक शेअर्समध्ये केलेली गुंतवणूकही टाळावी. सोशल मीडिया इन्फ्लुएनसर्सवर भरोसा ठेवण्यापेक्षा स्वत: बाजाराची माहिती करून घ्यावी.
फायनान्शिअल इन्फ्लुएनसर्स (Fake Financial Influencers)
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फायनान्शिअल इन्फ्लुएनर्ससचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडून गुंतवणुकीचे सल्ले दिले जातात. त्यावर विश्वास ठेवून अनेक जण गुंतवणूक करतात. स्वत: अभ्यास करून गुंतवणूक करण्यापेक्षा इन्फ्लुएनसर्सला फॉलो करतात. मात्र, त्यामुळे नुकसान होऊ शकते. अनेक फायनान्शिअल इन्फ्लुएनसर्सकडून चुकीचे सल्ले दिले जातात. त्यामुळे आता सरकारनेही अशा फेक इन्फ्लुएनसर्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल मीडियाबाबत वेगळी नियमावलीही तयार करता येत आहे.