नव्यानेच तुम्ही शेअर बाजार, मुच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्याकडून काही चुका होतील. 'चुकतो तोच शिकतो' असं म्हटलं जातं, हे अगदी खरं आहे. मात्र, चुका करताना होणारं नुकसान इतकं नको की, तुमचं पूर्ण दिवाळं निघेल. त्यामुळे एखाद्या कंपनीचा शेअर घेत असाल किंवा म्युच्युअल फंड निवडत असाल तर सखोल माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. खाली दिलेल्या चुका टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा.
Table of contents [Show]
आधी चूक मान्य करा मग सुधारा -
अनेक जण एखाद्या शेअर्समध्ये मोठे नुकसान होत असतानाही विकून टाकत नाही. आपण हा शेअर्स घेण्यास चूक केली हे प्रथम मान्य करा. समजा, तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतला. मात्र, काही दिवसांतच तो २० टक्क्यांनी खाली गेला आणि दिवसेंदिवस त्याची किंमत कमी होत आहे. अशा वेळी तुम्ही ते शेअर्स कमीत कमी नुकसान होण्याच्या पातळीवर विकून टाकायला हवे. कारण जर तो शेअर्स त्यापेक्षाही खाली तर. समजा काही दिवसांनंतर तोच शेअर्स ५० टक्क्यांनी खाली आला आणि त्यानंतर तुम्ही विकण्याचा निर्णय घेताल तर दुप्पट तोटा होईल. त्यामुळे सखोल विश्लेषण करुन तुम्ही निर्णय घ्यायला हवा.
कोणीतरी सांगितलं म्हणून गुंतवणूक करु नका
व्हॉट्सअॅपवरील मेसेज, युट्युब व्हिडिओ किंवा एखादा जवळचा मित्राने सांगितलं म्हणून गुंतवणूक करु नका. तुमचा स्वत:चा अभ्यास असू द्या. शेवटी नफा आणि तोटा तुमचा होणार आहे. बऱ्याच वेळा अशा ऐकीव माहितीतून केलेल्या गुंतवणूकीतून तोटा होता. झटपट श्रीमंत होण्याचे अनेक पर्याय तुम्हाला विकण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, तुम्ही त्याला भुलू नका.
तोट्यातील शेअर्स घेताना
एखाद्या शेअरचे मूल्य झाल्यावर अनेक जण विकत घेतात. भविष्यात शेअर्सचे मूल्य वाढल्यावर पुन्हा विक्री करता येईल, हा विचार त्यामागे असतो. मात्र, असे करण्यापूर्वी शेअरचे मूल्य का कमी झाले याची तुम्ही माहिती घेतली पाहिजे. नाहीतर तो शेअर्स आहे त्यापेक्षा अधिक तळाला जाईल आणि तुमचे मोठे नुकसान होईल.
जोखीमेचा विचार न करता फक्त परताव्याकडे पाहणे -
जोखीम हा प्रत्येक इक्विटी गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे आणि काही इक्विटी गुंतवणूक इतरांपेक्षा जास्त जोखमीच्या असतात. तथापि, लोक जोखमीला महत्त्व न देता फक्त परतावा पाहतात. स्टॉक फ्युचर्स तुम्हाला उत्तम परतावा देऊ शकतात परंतु त्याच वेळी ते तुमचे भांडवल देखील नष्ट करू शकतात. म्युच्युअल फंडाच्या संदर्भात, लोक फंडात गुंतवणूक करताना परतावा पाहतात, परंतु फंड व्यवस्थापकाने कोणत्या प्रकारची जोखीम घेतली आहे याचा विचार करत नाहीत. फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी करणे, त्यातील बारकावे न समजलेल्या गोष्टी जोखमीच्या असतात. जोखीम समजून घ्या, म्हणजे प्रत्येक गुंतवणुकीतील नकारात्मक बाजू आणि त्याच्याशी संबंधित अस्थिरता लक्षात येईल.
नफा आणि तोट्यातील शेअर्स विकताना-
अनेक जण एखाद्या चांगल्या शेअर्सवर थोडा नफा झाला की विकून टाकतात आणि जे शेअर्स तोट्यात आहेत ते नफ्यामध्ये येण्याची वाट पाहत बसतात. अल्प नफ्यासाठी तुम्ही चांगले शेअर्स सोडायला नकोत. पुढील काळात त्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते. जो शेअर तोट्यात आहे कदाचित तो आणखीही खाली जाऊ शकतो. त्यामुळे त्यातून बाहेर कधी पडायचे याचा निर्णय तुम्ही किती नुकसान सहन करु शकता, त्यावरुन ठरवायला हवे.