Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BH Number Plate: परराज्यात वाहन नोंदणीचा त्रास वाचणार, जुन्या गाड्यांनाही BH सिरीजमध्ये नोंदणी करता येणार

BH number plate

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वास्तव्यास जात असाल तर तुम्हाला तुमचे वाहनही ज्या राज्यात जात आहात तेथे पुन्हा नव्याने नोंदणी करुन घ्यावे लागते होते. मात्र, आता तुम्हाला पुन्हा पुन्हा नोंदणी करायची गरज नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने BH म्हणजेच भारत सिरीजच्या नंबर प्लेटचे नियम जुन्या वाहनांनाही लागू केले आहेत.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वास्तव्यास जात असाल तर तुम्हाला तुमचे वाहनही ज्या राज्यात जात आहात  तेथे पुन्हा नव्याने नोंदणी करुन घ्यावे लागते होते. मात्र, आता तुम्हाला पुन्हा पुन्हा नोंदणी करायची गरज नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने BH म्हणजेच भारत सिरीजच्या नंबर प्लेटचे नियम जुन्या वाहनांनाही लागू केले आहेत. याआधी फक्त नवीन वाहनांनाच BH सिरीजमध्ये नोंदणी करण्याची सुविधा होती. तिच्यात बदल करून आता जुनी गाडी असेल तरीही तुम्ही वाहनाची नोंदणी BH सिरीजमध्ये करू शकता. 

जुन्या वाहनांना BH नोंदणी करता येणार (BH registration for old vehicles)

मंत्रालयाने याबाबतचे नवे नियम आज (शुक्रवार) जाहीर केले. त्यामुळे आता तुमच्या वाहनाची आधीच नोंदणी झाली असेल तरी तुम्ही भारत सिरीजमध्ये नोंदणी करुन घेऊ शकता. मात्र, त्यासाठी  शुल्क आणि कर भरवा लागेल. त्यानंतरच BH नंबर प्लेट मार्क मिळेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जुन्या वाहनांना BH सुविधा लागू करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती, त्यामुळे नियमांत बदल करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

या निर्णयामुळे वाहन मालकांचा त्रास वाचणार आहे. यासाठी मोटार वाहन कायद्यातील नियम क्रमांक ४८ मध्ये बदल करण्यात आले आहेत. BH सिरीजमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही कामाच्या ठिकाणावरून किंवा तुम्ही वास्तव्यास ज्या ठिकाणी असाल तेथूनही अर्ज करू शकता, असे म्हटले आहे. 

भारत सिरीज नंबर प्लेट काय आहे? (What is Bharat series number plate)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२१ मध्ये भारत सिरीज नंबर प्लेट सुरू केली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्यानंतर प्रत्येक वेळी वाहनाची नोंदणी करावी लागू नये, हा उद्देश यामागे होता. मात्र, त्यांनतर नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना ही सुविधा लागू केली. आता जुन्या गाड्यांनाही भारत सिरीजसाठी नोंदणी करता येईल.  

महाराष्ट्रात सर्वाधिक नोंदणी 

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ४९ हजार ६०० गाड्यांची नोंदणी भारत सिरीज अंतर्गत झाली आहे. सर्वात जास्त १३ हजार ६२५ गाड्यांची महाराष्ट्रात नोंदणी झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ५ हजार ६९८ आणि राजस्थानात ५ हजार ६१५ गाड्यांची नोंदणी झाली आहे.