सर्वोत्तम सुविधा आणि परवडणाऱ्या दरातील घर उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडाकडून (MHADA) करण्यात येते. नुकतेच म्हाडाने मुंबई विभागासाठी 4083 घरांची लॉटरी काढली आहे. इच्छुक अर्जदार 26 जून 2023 पर्यंत लॉटरीसाठी अर्ज करू शकतात. आत्तापर्यंत 16,000 अर्जदारांनी लॉटरीसाठी अर्ज सादर केले आहेत. म्हाडाने आखून दिलेल्या पात्रता निकषांची पुर्तता केल्यानंतर अर्जदाराला संगणकीय प्रणालीद्वारे घर उपलब्ध करू देण्यात येते. याच पात्रता निकषांनुसार ज्या व्यक्तीने म्हाडाच्या घराचा लाभ घेतला आहे, तो व्यक्ती म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकत नाही, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र यामध्ये देखील एक गंमत आहे. ज्यामुळे तुम्ही म्हाडाच्या घरात राहात असला, तरीही लॉटरीतील घरासाठी पात्र ठरू शकतात. ते कसे, जाणून घेऊयात.
'या' अटींची पूर्तता करावी लागेल
म्हाडाकडून घर मिळवायचे असेल, तर म्हाडाने आखलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. या पात्रता निकषांमध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असून त्याने महाराष्ट्रातील कोणत्याही भागात किमान 15 वर्ष वास्तव्य केलेले असावे. त्यासोबतच म्हाडाच्या योजनेचा लाभ घेतलेला व्यक्ती म्हाडा लॉटरीत पुन्हा अर्ज करु शकत नाही. मात्र यामध्ये एक गंमत आहे.
तुम्ही भलेही म्हाडाच्या घरात राहात असला, तरीही जर ते घर तुमच्या आई- वडिलांच्या नावावर असेल आणि तुमच्या नावे कुठेच पक्के घर नसेल किंवा तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेतून घराचा लाभ घेतला नसेल, तर आणि तरच तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केल्यावर पात्र ठरू शकता.
महत्त्वाचं म्हणजे अर्जदार विवाहित असेल, तर त्याच्या पत्नीच्या नावे देखील शासकीय योजनेतील घर असता कामा नये. किंवा दोघांनीही प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) लाभ घेतलेला नसावा. अर्जदार वरील अटींची पूर्तता करत असेल, तर म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करून पात्र ठरू शकतो.
अर्ज करताना स्वतःचे आणि पत्नीचे (जर पत्नी कमवती असेल तर) वार्षिक उत्पन्न कौटुंबिक स्तरावर गणले जाईल. म्हाडाने आखून दिलेल्या उत्पन्न गटातून आपला उत्पन्न गट ओळखून अर्जदाराने लॉटरीत अर्ज करावा. म्हाडाच्या लॉटरीत वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहे. ज्याचा लाभ सर्वसामान्य लोक घेऊ शकतात.