लोकांच्या स्वप्नातील घराची पूर्तता करण्यासाठी म्हाडा लॉटरी काढत असते. नुकतीच म्हाडाने मुंबई विभागासाठी 4083 घरांची जाहिरात 22 मे रोजी प्रसिद्ध केली. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गटाची (HIG) वार्षिक उत्पन्न मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. या उत्पन्न गटानुसार तुम्ही लॉटरीतील घरासाठी अर्ज करू शकता. योग्य वर्गात अर्ज केल्यानंतर घर मिळण्याची संधी पटकन मिळू शकते. त्यामुळे आज अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटाची वार्षिक उत्पन्न मर्यादा समजून घेऊयात.
म्हाडाने जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका सोडतीनुसार उत्पन्नाची मर्यादा सुधारण्यात आली आहे. या सुधारित मर्यादेनुसार एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाची मर्यादा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
अत्यल्प उत्पन्न गट (EWS)
ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाखापर्यंत असते, ते लोक अत्यल्प उत्पन्न गटामध्ये (Economically Weak Section) येतात. या गटासाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी या लॉटरीत 2788 घरे उपलब्ध आहेत.
अल्प उत्पन्न गट (LIG)
अल्प उत्पन्न गटातील (Lower Income Group) लोकांचे उत्पन्न हे 9 लाखांपर्यंतचे असते. या गटात 1022 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. तुमचे उत्पन्न देखील 9 लाखांपर्यंत असेल, तर तुम्हीही यासाठी अर्ज करू शकता.
मध्यम उत्पन्न गट (MIG)
ज्यांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत असते, ते लोक मध्यम उत्पन्न गटात (Middle Income Group) येतात. म्हाडाच्या या लॉटरीत मध्यम उत्पन्न गटासाठी 132 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत.
उच्च उत्पन्न गट (HIG)
या उत्पन्न गटात कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही. मात्र किमान मर्यादा 12 लाख निश्चित करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये उच्च उत्पन्न गटात (Higher Income Group) 38 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांच्या किंमती कोटींमध्ये आहेत.
वरील उत्पन्न गटाचा नीट अभ्यास करून तुम्ही तुमचा उत्पन्न गट निवडून शकता आणि म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात.या लॉटरीसाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या दरम्यानचे वार्षिक उत्पन्न गणण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्नामध्ये कौटुंबिक उत्पन्न पकडण्यात येते. अर्जदारासोबत त्याच्या पत्नीचे उत्पन्न देखील यामध्ये गृहीत धरले जाते.नोकरीतून, उद्योगधंद्यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न यातून गणले जाते.