मुंबई ही स्वप्ननगरी आहे. याच स्वप्ननगरीत स्वतःचे हक्काचे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. लोकांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने मुंबई विभागासाठी 4083 घरांची लॉटरी काढली आहे. या लॉटरीत अर्ज (Mhada Lottery Registration) करण्यासाठी शेवटची तारीख 26 जून 2023 असणार आहे. मोजके कागदपत्रं, अर्ज आणि अनामत रक्कम भरल्यानंतर म्हाडाकडून संगणकीय प्रणालीद्वारे पुरवलेल्या कागदपत्रांची तपासणी करून यशस्वी अर्जदाराला घर उपलब्ध करून दिले जाईल.
प्रत्येक उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम ही वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. ही रक्कम अर्जासोबत भरणे बंधनकारक आहे. म्हाडा लॉटरीत अर्जदार यशस्वी झाला, तर घर हमखास मिळते. मात्र याउलट जर लॉटरीत अर्जदार अयशस्वी झाला, तर भरण्यात आलेले अर्जाचे शुल्क आणि अनामत रक्कम परत मिळते का? म्हाडाचा नियम यासंदर्भात काय सांगतो, जाणून घेऊयात.
नियम काय सांगतो?
म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना अर्जदाराला अर्ज शुल्क (Application Fee) आणि आपल्या उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरावी लागते. अर्जाची रक्कम ही सर्व अर्जदारांना एकसमान असते. त्यासाठी अर्जाचे शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ज्यावर 18 टक्के जीएसटी (GST) भरावा लागतो. जीएसटीची रक्कम 90 रुपये आहे. या दोन्ही रकमा मिळून अर्जासाठी अर्जदाराला 590 रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम विना परतावा स्वरूपात मोडली जाते. याचा अर्थ असा की, अर्जासाठी भरलेले शुल्क परत मिळत नाहीत.
प्रत्येक उत्पन्न गटानुसार म्हाडाच्या लॉटरीमध्ये राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. या वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ही वेगवेगळी असते. ही रक्कम जर म्हाडा लॉटरीत अर्जदार यशस्वी झाला नाही, तर त्याला परत केली जाते. लॉटरीत अयशस्वी झालेल्या अर्जदारांना आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना लॉटरीत भरलेली संपूर्ण रक्कम अर्जाचे शुल्क वगळून NEFT द्वारे अर्जदाराच्या बँक खात्यात पाठवण्यात येते. त्यासाठी अर्जदाराने अर्ज भरताना त्यामध्ये बँकेचे नाव, शाखेचे नाव,नंबर आणि पत्ता, बँक खाते क्रमांक, एम. आय.सी.आर (MICR) क्रमांक किंवा आय.एफ.एस.सी क्रमांक (IFSC) अचूकपणे नमूद केलेला असणे गरजेचा आहे.
ज्या अर्जदाराने डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट (Debit or Credit Card) केले आहे, अशा अयशस्वी अर्जदारांची आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची अनामत रक्कम देखील अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यावर पाठवण्यात येईल. त्यामुळे अर्जदाराने घाबरून जाण्याची किंवा पैसे बिडण्याची भीती मनात बाळगू नये.