MHADA Lottery: बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली म्हाडाच्या घरांसाठीची लॉटरीची तारीख ठरली असून म्हाडा मुंबईत 4,083 घरांसाठी 18 जुलैला सोडत काढणार आहे. यामध्ये सर्वाधिक अत्यल्प गटासाठी 2788 घरे, तर उच्च गटासाठी फक्त 38 घरे उपलब्ध असणार आहेत.
म्हाडा या सोडतीसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून लगेच त्यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून आहे आणि 18 जुलैला याची सोडत काढली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत काढली जाणार आहे.
म्हाडाने कोव्हिडच्या पूर्वी 2019 मध्ये घरांसाठी शेवटची लॉटरी काढली होती. त्या लॉटरीत फक्त 217 घरांचा समावेश होता. आता 4 वर्षांनंतर म्हाडा पुन्हा एकदा तब्बल 4083 घरांसाठी सोडत घेऊन आली आहे. 22 मे पासून इच्छुकांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. एकूण 4083 घरांपैकी 2788 घरे ही अत्यल्प गटासाठी, 1022 घरे अल्प गटासाठी 132 घरे मध्यम गटासाठ आणि 38 घरे उच्च गटासाठी राखीव असणार आहेत. तसेच 102 घरे ही विखुरलेली असून ती वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या गटातील आहेत. त्याची माहिती जाहिरातीमध्ये असणार असून त्यानुसार अर्ज करता येईल.
Table of contents [Show]
अत्यल्प गटासाठी 2,788 घरे
अत्यल्प गटातील घरासाठी गोरेगावमधील पहाडी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1,947 घरे, अॅन्टॉप हिलमध्ये 417 तर विक्रोळीमधील कन्नमवार नगरमध्ये 424 घरे असणार आहेत. गोरेगावमधील घरांसाठी केंद्र सरकारकडून 2.50 लाखांचे अनुदान मिळणार असून त्या घरांची किंमत 30 लाख 44 हजार रुपये असणार आहे. तर इतर ठिकाणच्या घरांची किंमत 40 लाखांच्या आसपास असणार आहे.
अल्प गटासाठी 1,022 घरे
अल्प गटासाठी उपलब्ध असलेल्या घरांमध्ये 736 घरे ही गोरेगावमधील पहाडी परिसरात आहेत. तर उर्वरित घरे ही दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), मालामडमधील गायकवाड नगर, बोरिवली येथील पत्राचाळ, जुने मागाठाणे, चारकोप, विक्रोळीमधील कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी आणि मुलुंडमधील गव्हाणपाडा येथे असणार आहेत.
मध्यम गटासाठी 132 घरे
मध्यम गटासाठी उपलब्ध असलेली 132 घरे ही दादर, चेंबूरमधील टिळक नगर, सहकार नगर आणि कांदिवली येथे उपलब्ध आहे.
उच्च गटासाठी 38 घरे
उच्च गटासाठी फक्त 38 घरे उपलब्ध असणार असून ती घरे मुंबई शहरात ताडदेव, लोअर परळ, सायन याचबरोबर बोरिवली येथील शिंपोली आणि पवईमधी तुंगा पवई येथे उपलब्ध असणार आहेत.