लोकांच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी म्हाडाकडून 22 मे 2023 रोजी मुंबई विभागासाठी 4083 घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. आतापर्यंत या लॉटरीत 16,000 हून अधिक अर्जदारांनी अर्ज केले आहेत. म्हाडाचे घर मिळवण्यासाठी आखून दिलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. अनेकदा नवी मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला मुंबईत घर घेण्याची इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांचे दर हे गगनाला भिडल्याने ते प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होत नाही. अशा वेळी म्हाडाची लॉटरी ही एक सुवर्णसंधी असू शकते. परंतु अर्जदार सिडकोच्या (CIDCO) घराचा लाभार्थी असेल, तर तो म्हाडाच्या घरासाठी पात्र ठरेल का? याबाबत म्हाडाचा नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.
नियम काय सांगतो?
नवी मुंबई (Navi Mumbai) हे नव्याने बसवलेले शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला वसवण्यात सिडकोचे मोठे योगदान आहे. स्थलांतरितांचे शहर म्हणून नवी मुंबई परिचयाची आहे. नवी मुंबईत सिडको (CIDCO) देखील लोकांच्या घराचे स्वप्न साकार करते. मात्र सिडकोच्या घराचा लाभ घेतलेला व्यक्ती म्हाडाच्या घरासाठी पात्र ठरू शकत नाही.
म्हाडाने आखून दिलेल्या पात्रता अटींनुसार लॉटरीतील घर मिळवण्यासाठी अर्जदाराने कोणत्याही शासकीय योजनेतून घराचा लाभ घेतलेला नसावा. या योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना, सिडको लॉटरीतील घर, घरकुल योजना इ. योजनांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojana) देखील अर्जदाराने घराचा लाभ घेतलेला नसावा. जर म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्जदाराने अर्ज केला, तर अर्जदाराचा फॉर्म बाद करण्यात येतो.
याशिवाय अर्जदाराचे जर लग्न झाले असेल, तर अशा परिस्थितीत अर्जदार शासकीय योजनेतील घराचा लाभार्थी जरी नसला, पण त्याची पत्नी किंवा पती शासकीय योजनेतील घराचे लाभार्थी असतील, तरीही म्हाडाच्या घरासाठी अर्जदार पात्र ठरू शकत नाही. कारण पती-पत्नी हे घराचे सह-भागीदार असतात. मिळालेल्या घरावर पती किंवा पत्नीचा समान अधिकार असतो. त्यामुळे या अटीची पूर्तता करणे गरजेचे आहे.पती किंवा पत्नी दोघांनीही राज्य किंवा केंद्राच्या शासनाच्या कोणत्याही योजनेतून घराचा लाभ घेताना नसेल, तर आणि तरच म्हाडाच्या लॉटरीत ते पात्र ठरू शकतात.