वाद आणि नॉन-स्टॉप ड्रामासह चार महिन्यांचा बिग बॉस 16 चा प्रवास आता संपला आहे. रॅपर एमसी स्टॅनने (MC Stan) बिग बॉसची प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. रॅपर असलेल्या स्टॅनने एकतीस लाख ऐंशी हजार रुपये (रु. 31,80,000) आणि नवी कोरी कार आपल्या नावावर केली आहे. बिग बॉसच्या घरात राहायची इच्छा नाही असं म्हणणारा स्टॅन आता विजेता बनलाय.बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यास स्टॅन योग्य नाही असे त्याचे सहस्पर्धक म्हणत होते. MC Stan हा शो जिंकण्याच्या रेसमध्ये टिकू शकणार नाही असे देखील काही दर्शक म्हणत होते. परंतु कार्यक्रमाचा होस्ट असलेल्या सलमान खानने आणि स्वतः बिग बॉसने स्टॅनला गेम खेळण्यासाठी वेळोवेळी प्रेरित केले होते.शोच्या दरम्यान स्टॅनच्या गर्लफ्रेंडने, बुबाने स्टॅनसाठी टी-शर्ट देखील पाठवला होता. दिवसेंदिवस खेळातील स्टॅनचा आत्मविश्वास वाढत गेला आणि आता तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकून लखपती बनलाय!
एमसी स्टॅन हा एकमेव स्पर्धक होता जो शेवटपर्यंत टिकून राहिला. स्टॅनने खेळासाठी स्वतःबद्दल काहीही बदल केले नाही. स्पष्टपणे आणि मोठ्या आवाजात व्यक्त होण्याची त्याची खासियत होती. त्यांची ही क्षमताच त्याची सर्वात मोठी प्रतिभा ठरली असे स्टॅनच्या फॅनचे म्हणणे आहे. बिग बॉसच्या घरात स्टॅन कुणालाही घाबरला नाही आणि स्वतःच्या मित्रांचा सामना करण्यास देखील त्याने मागेपुढे पाहिले नाही.
एमसी स्टॅनचे खरे नाव
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. वयाच्या 12 व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली होती. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म देखील केले आहे. एमसी स्टॅनने आतापर्यंत अनेक गाणी गायली असली तरी यूट्यूबवर जवळपास 21 मिलियन व्ह्यूज मिळालेल्या 'वाटा' या गाण्याने त्याला लोकप्रियता मिळाली. एमसी स्टॅनला भारताचा टुपॅक देखील म्हटले जाते.
बिग बॉसच्या आतापर्यंतच्या विजेत्यांना मिळालेली बक्षिसे
3 नोव्हेंबर 2006 रोजी बिग बॉस सीझन 1 ला सुरुवात झाली. यात अर्शद वारसी यांनी होस्ट म्हणून पदार्पण केले आणि तेव्हापासून हा शो जगभरात लोकप्रिय झाला आहे. यात विजेत्यांचा मोठा इतिहास आहे आणि संबंधित सिजनमध्ये विजेत्यांना अनेक आकर्षक रोख बक्षिसे दिली गेली. बक्षिसांचा थोडक्यात आढावा घेऊयात.,
राहुल रॉयने बिग बॉसचा पहिला सीझन जिंकला आणि 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळवले होते. त्यानंतर, आशुतोष कौशिकने दुसरा सीझन जिंकला आणि त्याला 1 कोटी INR चे रोख बक्षीस मिळाले.
त्यापाठोपाठ विंदू दारा सिंगनेही 1 कोटी रुपये मिळवले. श्वेता तिवारी आणि जुही परमार यांनी अनुक्रमे बिग बॉसचा चौथा आणि पाचवा सीझन जिंकला होता. दोघांनी प्रत्येकी 1 कोटी रुपये जिंकले होते. त्यानंतरच्या हंगामात रोख बक्षीस 50 लाख रुपयांपर्यंत कमी झाले. सहाव्या सीझनपासून सुरू होऊन अकराव्या हंगामापर्यंत, विजेत्यांनी INR 50 लाख जिंकले आहेत. सहा ते अकरा सिजनमधील विजेते अनुक्रमे गौहर खान, गौतम गुलाटी, प्रिन्स नरुला, मनवीर गुर्जर आणि शिल्पा शिंदे होते.या सर्वांनी प्रत्येकी 50 लाखांचे बक्षिसे मिळवले. बिग बॉसच्या अकराव्या सिजननंतर बक्षिसाच्या रकमेत चढ-उतार होत आहेत. बाराव्या सिजनचे विजेतेपद पटकावणाऱ्या दीपिका कक्करला 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. तर,बिग बॉस सीझन 13 जिंकल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाने 40 लाख रुपयांची कमाई केली होती. रुबिना दलाईकला सीझन 14 साठी 36 लाख रुपये आणि तेजस्वी प्रकाशला सीझन 15 जिंकल्यानंतर 40 लाख रुपये मिळाले होते.