इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) किंवा यूट्यूब (Youtube) असं कोणतंही प्लॅटफॉर्म तुम्ही वापरत असाल, तर इन्फ्लूएन्सर हा शब्द तुमच्यासाठी नवा नसेल. छोट्या व्हिडिओंपासून (Shorts) ते रील्सपर्यंत (Reels) हे लोक म्हणजेच इन्फ्लूएन्सर्स देशातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान ब्रँडच्या विक्रीवर आपला प्रभाव पाडत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेनं देशात ब्रँडची विक्री करण्याची पद्धतदेखील पूर्णपणे बदलली आहे. यामुळे आता इन्फ्लूएन्सर्सची (Influencers) अर्थव्यवस्थादेखील निर्माण झाली आहे. म्हणूनच 10 कोटींहून अधिक उत्पादनांची विक्री काही लाख इन्फ्सूएन्सर्सवर अवलंबून आहे.
Table of contents [Show]
ब्रँड्स थेट ग्राहकांपर्यंत...
शॉर्ट्स आणि रील्स बनवून ब्रँडचा प्रचार करणाऱ्या या इन्फ्लूएन्सर्सचे फॉलोअर्स कोटींमध्ये आहेत. अशा परिस्थितीत ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्यास मदत होते. दुसरं म्हणजे, महागड्या जाहिरातींचे व्हिडिओ शूट किंवा ब्रँड अॅम्बेसेडर यांच्यावर होणारा खर्चही वाचतो. इन्फ्लूएन्सर्स बहुतेक ब्रँड किंवा त्यांची उत्पादनं त्यांच्या स्वतःच्या व्हिडिओंसह शूट करत असतात. तर ग्राहकांना मनोरंजनासह ब्रँडची माहिती मिळते.
रेडसीरचा रिपोर्ट
इन्फ्लूएन्सर्सच्या या अर्थव्यवस्थेचं निरीक्षण करणार्या रेडसीरनं (RedSeer) यासंदर्भात एक रिपोर्ट दिला आहे. यात म्हटलंय, की इन्फ्लूएन्सर्स हे आजकाल ब्रँडच्या डिजिटल अॅडव्हरटाइज पॉलिसीचा महत्त्वाचा भाग झाले आहेत. त्यांच्याद्वारे तयार केलेल्या कंटेंटवर, सामान्य जाहिरातींपेक्षा दुप्पट एंगेजमेंट दिसून येते. ते थेट फॉलोअर्सशी जोडले जातात. त्यामुळेच आजकाल ते ब्रँडसाठी एक महत्त्वाचं रिलेशनशीप टूल बनत आहेत.
इन्फ्लूएन्सर्सचे प्रकार
इंटरनेटचा प्रसार वेगानं झाला आहे. त्यामुळे नेम-फेमच्या या गेमचं लोकशाहीकरणच झालं आहे. भारतात सुमारे 35 ते 40 लाख इन्फ्लूएन्सर्स आहेत. त्यांच्या फॉलोअर्ससह त्यांना एलिट, मेगा, मॅक्रो आणि मायक्रो लेव्हलच्या कॅटेगरीमध्ये विभागलं जाऊ शकतं. हे इन्फ्लूएन्सर्स देशातल्या सुमारे 100 दशलक्ष लहान आणि मोठ्या ब्रँड्सना प्रमोट करण्यासाठी काम करतात.
रिपोर्टमधली आकडेवारी
रेडसीरनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की भारतातले सुमारे 42 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या तरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. यापैकी सुमारे 67 टक्के म्हणजेच जवळपास 281 दशलक्ष यूझर्स कोणत्यातरी इन्फ्लूएन्सरला फॉलो करतातच. यापैकी 28 टक्के म्हणजे सुमारे 11.8 कोटी लोक इन्फ्लूएन्सर्सनं जाहिरात केलेलं कोणतंही उत्पादन किंवा सेवा वापरतात.
फायद्याचा सौदा
रिपोर्टमधल्या बाबी पाहिल्यास एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती म्हणजे हा डिजिटल मार्केटिंगचा गेम इन्फ्लूएन्सर्स आणि ब्रँड अशा दोघांसाठीही फायद्याचा सौदा आहे. यामुळे ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ब्रँडचं प्रमोशन हा इन्फ्लूएन्सर्ससाठी कमाईचा एक चांगला मार्ग आहे. फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्सच्या आधारे ब्रँड त्यांच्या इन्फ्लूएन्सर्सशी वाटाघाटी करू शकतात. रेडसीरचा अंदाज आहे, की 2028पर्यंत देशातलं इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंग 2.8 अब्ज ते 3.5 अब्ज डॉलर इतकं असेल.