शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना एखाद्या कंपनीमध्ये काय पाहिले जाते? त्या कंपनीची ग्रोथ, कंपनीचा परफॉर्मन्स, रेव्हेन्यू रिपोर्ट्स, कंपनीचा इतिहास आणि मार्केटमध्ये असणारी कंपनीची व्हॅल्यू इत्यादी गोष्टीतून कंपनीची कामगिरी लक्षात येते. त्यामुळे यात गुंतवणूक करायची की नाही, याचा निर्णय घेणे शक्य होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक ट्रेडर, इन्व्हेस्टर किंवा या क्षेत्रात नव्याने आलेले गुंतवणूकदार अशाच पद्धतीने अभ्यास करतात. पण एखाद्या कंपनीचा अभ्यास करताना ती माहिती खोटी निघाली तर? तुम्ही म्हणाल असे कसे होऊ शकेल. तर हे तुम्हाला वाटते तितके अशक्य वाटणारे नक्कीच नाही. कारण ही गोष्ट शक्य करून दाखवली बिर्राजू रामलिंग राजू (Byrraju Ramalinga Raju) यांनी. 2009 मधील सत्यम कॉम्पुटर सर्व्हिसेस स्कॅम (Satyam Computer Services Scam) हा भारतातील पहिला व सर्वात मोठा कॉर्पोरेट स्कॅम (Corporate Scam) होता. ज्याचे कर्तेधर्ते होते रामलिंग राजू. चला तर मग आजच्या मार्केट स्कॅममध्ये (Market Scam) जाणून घेऊयात; काय आहे सत्यम कॉम्पुटर सर्विसेस स्कॅम.
Table of contents [Show]
सत्यम कॉम्पुटर सर्विसेस लिमिटेडचा प्रवास (Satyam Computer Services Ltd)
हैद्राबादमधील दोन भाऊ रामा राजू आणि रामलिंग राजू, 1987 मध्ये सत्यम कॉम्पुटर सर्विसेस लिमिटेड (Satyam Computer Services Ltd) या कंपनीची स्थापना करतात. ही कंपनी IT (Information Technology) आणि BPO (Business Process Outsourcing) सुविधा पुरवणारी कंपनी होती. जी वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये सेवा पुरवत होती. सुरुवातीपासूनच फायद्यात असणारी ही कंपनी काही दिवसांत मोठी कंपनी बनली आणि तिने 1991 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) मध्ये IPO फाईल केला. काही दिवसांतच सत्यम कॉम्पुटर सर्विसेस लिमिटेड IT सेक्टर मधली एक मोठी व नावाजलेली कंपनी बनली. TCS, Wipro आणि Infosys नंतर IT मधल्या मोठ्या कंपन्यांच्या यादीत सत्यम कॉम्पुटर सर्विसेस लिमिटेड चौथ्या क्रमांकावर आली. या कंपनीत जवळजवळ 50 हजार लोक काम करत होते. तसेच कंपनी 60 पेक्षा अधिक देशांमध्ये सेवा पुरवत होती. कंपनीने 2003 मध्ये 1 बिलियन डॉलर्सचा तर 2008 मध्ये 2 बिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला.
मायतासच्या खरेदीवरून गुंतवणूकदारांकडून नाराजी!
2008 मध्ये कंपनीने मायतास (Maytas) या रिअल इस्टेट कंपनीला विकत घेण्याचे ठरवले ज्याचे मालक रामलिंग राजू हेच होते. कंपनीचा हा निर्णय इतर भागधारकांना मुळीच पटला नाही. त्यामुळे 12 तासात हा निर्णय कंपनीने रद्द केला. या घटनेमुळे कंपनीच्या स्टॉकवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
भारतातल्या मोठ्या कंपनी मागचा खरा चेहरा!
डिसेंबर 2008 मध्ये मायतास (Maytas) कंपनी विकत घेण्याचा चुकीचा निर्णय व वर्ल्ड बँकेद्वारे केले गेलेले आरोप यामुळे कंपनीच्या स्टॉकवर चांगलाच परिणाम झाला. या फटक्यातून कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्वेस्टर्स सावरत होते. तोवर कंपनीचे मालक रामलिंग राजू 7 जानेवारी 2009 मध्ये कंपनी सोडत असल्याचा निर्णय जाहीर करतात आणि त्या सोबतच 7 हजार कोटी रुपयांच्या अकाउंटचे मॅनिप्युलेशन केल्याची कबुली देतात. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील इन्वेस्टर्स रामलिंग राजू यांच्या या कबुलीमुळे हादरून जातात.
एक पाऊल मागे जाऊयात!
सत्यम कॉम्पुटर सर्विसेस लिमिटेडने नक्की काय केले. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा 1999 मध्ये जावे लागेल. कंपनीचे मालक रामलिंग राजू अकाउंट्स मॅनिप्युलेशनची सुरुवात इथूनच करतात. ते कंपनीच्या क्वाटरली प्रॉफिट (Quarterly Profit) रिपोर्ट्स (Reports) मध्ये वाढ दाखवत होते. ज्यामुळे कंपनीचे अॅनालिसिस करणाऱ्यांच्या नजरेत कंपनीचे चित्र एकदम सुंदर दिसेल. उदाहरणार्थ राजू यांनी 17 ऑक्टोबर 2009 मध्ये कंपनीचा क्वाटरली प्रॉफिट (Quarterly Profit) 97 टक्के तर क्वाटरली रेव्हेन्यू (Quarterly Revenue) 75 टक्के दाखवला होता. कंपनीचे असे आकडे दिसल्यावर कोणता इन्व्हेस्टर कंपनीच्या प्रेमात पडणार नाही? यामुळे सर्व जण कंपनीच्या खोट्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवत होते. राजू यांना रिपोर्ट्समधील आकडे फुगवण्यासाठी कंपनीचे अंतर्गत ऑडिट करणाऱ्या कंपनीच्या जागतिक प्रमुखाचीदेखील साथ होती.
राजू आपल्या स्वतःच्या कॉम्पुटरचा वापर करून खोटे बँक स्टेटमेंट्स (Bank Statements) तयार करत होते. या सर्व उचापत्यांमुळे कंपनीचे रिपोर्ट्स सतत नफ्यात दिसत होते. जे पाहून बॅंका पटकन लोन देत होत्या. खोट्या रिपोर्ट्समूळे कंपनीची खोटी वाढ देखील होत होती. रामलिंग राजू यांनी एका मागोमाग अनेक घोटाळे केले. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खोटे रेकॉर्डस् तयार करून त्यांचा पगार ते स्वतःच्या अकाउंटमध्ये घेत. यातून रामलिंग राजू एका महिन्यात किमान 3 मिलियन डॉलर्स कमावत होते.
रामलिंग यांचा काळा पैसा कुठे जात होता?
राजू यांनी सत्यम नावाची एक उत्तम IT कंपनी तर उभी केली होती. पण सुरूवातीपासून त्यांचा रस रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) होता. हैद्राबादमध्ये 2000च्या दरम्यान रिअल इस्टेट बिझनेस तेजीत होता. त्यांनी हैद्राबादमधील मेट्रोचे काम घेतले. या कामासाठी त्यांनी आपला सगळा पैसा वापरला. पण यात नेमके उलटे झाले. 2008 च्या मंदीत इतर सेक्टर्सप्रमाणे रिअल इस्टेट सेक्टरला सुद्धा मोठा फटका बसला आणि रामलिंग राजूचा प्लॅन अयशस्वी ठरला.
अखेर खोट्या रिपोर्टसचे पितळ उघडे पडले!
2008 पर्यंत कंपनीने इतके खोटे रिपोर्ट्स तयार केले की, ज्यामुळे जवळजवळ 1.04 बिलियन डॉलर्सचा गॅप तयार झाला. जो भरून काढणे अशक्य झाले होते. यावर उपाय म्हणून ते मायतास (Maytas) कंपनी विकत घेण्याचे ठरवतात. जेणेकरून हे पैसे कंपनी विकत घेण्यासाठी वापरले गेले असे दाखवता आले असते. पण भागधारकांच्या विरोधामुळे रामलिंग राजू यांना मायतास कंपनी विकत घेण्याचा पर्याय सोडून द्यावा लागला आणि शेवटी स्वतःला कायद्याच्या हवाली करावे लागले.
रामलिंग राजू यांच्या कबुलीनंतर काय?
रामलिंग राजू यांच्या कबुलीनंतर त्यांना दोन दिवसांत अटक करून त्यांच्यावर गुन्हेगारी कट, विश्वास भंग आणि खोटेपणा अशा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात जमिनीच्या खरेदी-विक्रीची प्रकरणे सापडली. त्याचबरोबर 13 हजार कर्मचाऱ्यांचे खोटे रेकॉर्ड सापडले. ज्यामुळे हा स्कॅम 7 हजार कोटी रुपयांचा असल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारामुळे सत्यम कंपनीचा शेअर घसरला. परिणामी 13 एप्रिल 2009 मध्ये कंपनीचा लिलाव करण्यात आला. ही कंपनी Tech Mahindra विकत घेतली.
अशाप्रकारे खोट्या माहितीच्या आधारे सत्यम कंपनीच्या माध्यमातून रामलिंग राजू यांनी संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कागदपत्रांवर विश्वास ठेवला. पण त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अशाप्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.