Market Closing Bell: कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यापासून भारतीय भांडवली बाजारातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. सकाळच्या सत्रात किंचित वाढ झाल्यानंतर आघाडीचे निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक पुन्हा खाली आले. बाजार स्थिर होताना सेन्सेक्स सपाट मात्र, हिरव्या रंगात बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक किंचित घसरणीसह लाल रंगावर बंद झाला. बाजार बंद झाल्यानंतर म्हणजेच दुपारी साडेतीन नंतर रिलायन्स इंडस्ट्रीज तिमाही निकाल जाहीर करणार आहे. त्याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे.
धातू, सार्वजनिक बँका, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स आज खाली आले. रिलायन्सचे निकाल काही वेळात जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी शेअर्स वरती गेला आहे. बाजार बंद होण्याआधी रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर 4% नी वधारून 2,351 वर गेला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,618.65 अंकांवर बंद झाला तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 59,655.06 अंकांवर बंद झाला. अमेरिकेतील महागाईची आकडेवारीची माहिती अद्याप समोर आली नाही. अमेरिकेत मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे युएस फेडरल बँक दरवाढ करण्याचीही शक्यता आहे. या गोष्टीचा अंदाज बांधत गुंतवणुकदार बाजारात सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.
कोणते शेअर्स वाढले, कोणते घसरले?
निफ्टी निर्देशांकातील ITC, TCS, ब्रिटानिया, विप्रो, सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स वरती गेले. तर एचडीएफसी लाइफ, टेक महिंद्रा, अदानी एंटरप्राइजेस, एसबीआय लाइफ आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खाली आले. बँक निफ्टी निर्देशांक 42100 अंकांच्या पुढे बंद झाला. निफ्टी आयटी निर्देशांकात 180 अंकांची प्रगती झाली.
उन्हाळ्यातील विजेची गरज आणि अपुऱ्या मान्सूनचा अंदाज
उन्हाळ्यात विजेची अतिरिक्त गरज भासत असते. मात्र, यावर्षी सरकारने आधीच उपाययोजना केल्या असल्याने विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. सोबतच मान्सून अपुरा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमी पावसामुळे कृषी उत्पन्न जर घटले तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील इतरही क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेतील दोनशे पेक्षा जास्त क्षेत्रांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जोडलेले असते. जागतिक स्तरावरील मंदीचा सावट असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. असे असले तरी फार मोठी उलथापालथ भारतीय बाजारात दिसून येत नाही.