दुसऱ्या कंपनीकडून अधिक चांगलं पॅकेज मिळतंय म्हणून अनेकजण नोकरी बदलतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा काहीतरी अंदाज चुकतोय. ऑफिसचं काम आणि कुटुंबियांना स्वत:साठी वेळ यातील ताळमेळ साधता येत नसल्याने (Work life Balance) सर्वात जास्त कर्मचाऱ्यांनी नोकरी 2022 वर्षात सोडली आहे. InFeedo या मनुष्यबळ विश्लेषण क्षेत्रातील कंपनीने जॉब ट्रेंडबाबत एक सर्वे केला. यातून ही धक्कादायक माहिती समोर आली. मॅनेजरची वागण्याची काम करण्याची पद्धत हे दुसरं मोठं कारण आहे.
कुटुंब आणि कामाचा समतोल (Family and work balance of employee)
भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आयटीसह इतर क्षेत्रातील कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होम हा पर्याय स्वीकारला. घरातून आरामात काम करता येईल, अशी कर्मचाऱ्यांची आशा होती. मात्र, वर्क फ्रॉम होम करताना अनेकांना जास्त काम आणि प्रेशर सहन करावा लागला. यातूनच काहींना कुटुंब आणि ऑफिसच्या कामाचा समतोल साधता आला नाही. घरून काम करत असताना कर्मचाऱ्यांना कंपन्यांची कठोर धोरणेही अडचण ठरत होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर परत येण्यास नकार दिला. रिमोट वर्कची डिमांड वाढू लागल्याने ज्या कंपन्या रिमोट वर्कची सुविधा देत नाही, अशा कंपन्यांना कर्मचाऱ्यांनी रामराम ठोकला. तसेच ज्या कंपन्या रिमोट वर्कची सुविधा देत आहेत त्याना प्राधान्य दिले.
नोकरी सोडण्यामागील टॉप सात कारणे( Top seven reason of job resign)
2022 वर्षात नोकरी सोडण्यामागील सर्वात मोठी कारणे समोर आली आहेत. वर्क लाइफ बॅलन्स साधण्यातील अडचणींमुळे सुमारे 34 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. तर मॅनेजर चा त्रास आणि पगार सोई सुविधा पुरेशा नसल्यानेही अनेकांनी नोकऱ्या सोडल्या. मानसिक त्रास आणि कौतुकाची थाप सिनियर्सकडून न मिळणे हे सुद्धा नोकरी सोडण्यामागील एक मोठे कारण आहे.
एका वर्षाच्या आत 50 टक्के सोडतात नोकरी (Half of employee leave job within first year)
मागील वर्षात जॉब सोडण्यामागील सात मोठी कारणे या सर्वेतून समोर आली आहेत. तसेच ह्युमन रिसोर्स विभागाला यातून योग्य माहिती मिळावी हा उद्देशही यामागे होता. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकरीसंदर्भातील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. नव्याने नोकरीवर रुजू झाल्यानंतर वर्षाच्या आतमध्ये काम सोडून देणाऱ्यांचे प्रमाण 50% असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे चालू वर्षात नव्याने रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना टिकून ठेवण्यासाठी काय करावे लागेल, याकडे कंपन्यांनी लक्ष द्यायला हवे, असे अहवालात म्हटले आहे.