सध्या महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या राहाणीमानावर होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या आणि उपभोगाच्या वस्तू देखील महाग झाल्या आहेत.तरुणाई वेगवेगळ्या गोष्टींवर पैसे खर्च करते. मात्र हा खर्च करताना आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. कमी वयात केलेल्या बचतीमुळे पुढील आयुष्यात तुमच्याकडे जास्त पैसे साठू शकतात. ज्याचा वापर करून तुम्ही लक्ष्यित ध्येय साध्य करु शकता. आर्थिक नियोजन करताना तरुणाईने बचतीच्या कोणत्या टिप्स वापरायला हव्यात, ते जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
- चैनीच्या गोष्टींवरील खर्च कमी करा (Reduce spending on luxuries)
- आर्थिक व्यवहारांसाठी बँकिंग कार्ड्सचा वापर कमी करा (Minimize the use of bank cards for financial transactions)
- खर्चाची नोंद ठेवायला शिका (Keep track of expenses)
- छोट्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या (Prefer small investments)
- कर बचतीच्या दृष्टिकोनातून विचार करा (Think from a tax saving point of view)
चैनीच्या गोष्टींवरील खर्च कमी करा (Reduce spending on luxuries)
सध्याची तरुणाई बिनधास्तपणे खर्च करते. कोणताही खर्च करताना ती सारासार विचार करत नाही. त्यांचा बहुतांश खर्च हा चैनीच्या आणि आवश्यकता नसलेल्या गोष्टींवर केला जातो. कोणताही खर्च करताना गरज आणि चैनीच्या वस्तू याची तुलना करणे गरजेचे आहे. गरजेच्या वस्तूंमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय खर्च याचा समावेश होतो. तर चैनीच्या गोष्टींमध्ये स्मार्टफोन, टू व्हीलर, पिकनिकची बिले, पार्टीची बिले, महागड्या लाईफस्टाईलच्या वस्तूंचा खर्च समाविष्ट असतो. अशा चैनीच्या गोष्टींसाठी ठराविक बजेट निश्चित करणे गरजेचे आहे. हा वायफळ खर्च कमी केला, तर पैशांची बचत होऊ शकते.
आर्थिक व्यवहारांसाठी बँकिंग कार्ड्सचा वापर कमी करा (Minimize the use of bank cards for financial transactions)
सध्या आपण आर्थिक व्यवहारांसाठी बँकिंग कार्ड्स किंवा UPI चा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहोत. बँकेकडून वेगवेगळी क्रेडिट कार्ड्स (Credit Card) ग्राहकांना दिली जातात. ज्यावर क्रेडिट लिमिट देण्यात येते. त्यामुळे अनेकदा पैसे नसताना देखील ग्राहक क्रेडिट लिमिटचा (Credit Limit) वापर करून खरेदी करतात. बँकेच्या क्रेडिट कार्डवरून केलेली खरेदी ही कर्ज काढून केलेल्या खरेदी समानच आहेत. ग्राहकांना कालांतराने हे पैसे भरावेच लागतात. त्यामुळे कोणतीही खरेदी करण्यापूर्वी खरंच त्या गोष्टीची गरज आहे का? हा विचार एकदा करा. कार्ड्स किंवा UPI चा वापर कमी करून कॅशचा वापर वाढवा. कॅश खर्च करताना खर्चाचा अंदाज येतो. ज्यामुळे वायफळ खर्चावर नियंत्रण मिळवता येते.
खर्चाची नोंद ठेवायला शिका (Keep track of expenses)
तुम्ही कोणताही खर्च करत असाल, तर त्याची नोंद ठेवायला शिका. छोट्या मोठ्या खर्चाच्या नोंदीमुळे तुम्ही केलेले खर्च लक्षात येतील. आठवड्याच्या शेवटी या खर्चाचा हिशोब करा. त्यातून वायफळ खर्च किती झाला? का झाला? याचा अभ्यास करा. हा खर्च कसा कमी करता येईल यावर उपाय शोधा. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही सलग महिनाभर केली, तर तुमचा वायफळ खर्च कमी होण्यास मदत होईल.
छोट्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या (Prefer small investments)
पैशाची बचत करण्यासोबत त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे देखील गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैशाची आवश्यकता असते. अशा वेळी दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक मोडली, तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे छोट्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या. काही आठवड्यासाठी, महिन्यांसाठी, किंवा एका वर्षासाठी गुंतवणूक करायला शिका. या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या गरजेच्या गोष्टी खरेदी करू शकता. अशा गुंतवणुकीमुळे दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीला हात लावला जात नाही.
कर बचतीच्या दृष्टिकोनातून विचार करा (Think from a tax saving point of view)
टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीला सुरुवात करताना कर बचतीचा देखील विचार करा. कर बचतीच्या दृष्टिकोनातून कुठे गुंतवणूक करता येईल, त्याचा कालावधी काय असेल ते ठरावा आणि त्या दृष्टीने पाऊले उचला. सुरुवातीपासूनच जर तुम्ही कर बचतीचा विचार करून गुंतवणूक केली, तर पुढे जाऊन कर सवलत मिळवताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. अनेकजण मार्च महिन्यातच गुंतवणूक करतात. अशा वेळी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करता कर सवलतीच्या योजनांचा विचार करा.