Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Planning: यावर्षी स्मार्ट गुंतवणूक करून मिळवा चांगला परतावा

Investment Planning

Investment Planning: गेल्या काही महिन्यांपासून भारतात महागाईचा दर वाढतो आहे. रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ होते आहे. एप्रिलमध्ये पुन्हा यांत वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी योग्य पर्याय निवडले पाहिजेत असा सल्ला गुंतवणूक तज्ञ संजय पवार यांनी दिलाय. जाणून घ्या सविस्तर माहिती.

येत्या आर्थिक वर्षात जर पद्धतशीर गुंतवणूक करून अधिकाधिक परतावा मिळवायचा असेल तर आतापासून नियोजन करणे गरजेचे आहे. बँकिंग क्षेत्रातील सध्याची उलथापालथ, जागतिक मंदीचा धोका, वाढती महागाई आणि बदलते जागतिक राजकारण या सगळ्यांचा प्रभाव सामान्यांच्या गुंतवणुकीवर पडणार असल्याचे मत गुंतवणूक तज्ज्ञ संजय पवार यांनी व्यक्त केले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून भारतात महागाईचा दर वाढतो आहे. रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ होते आहे. एप्रिलमध्ये पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी योग्य पर्याय निवडले पाहिजे असे ते म्हणाले.

म्युच्युअल फंड LTCG मधून बाहेर ठेवण्याचा प्रस्ताव

डेट म्युच्युअल फंड (Debt Mutual Fund) बाबतीत असा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे. खरे तर दीर्घकालीन गुंतवणूक योजना म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडकडे बघत होते. त्यातून चांगला परतावा देखील त्यांना मिळत होता.परंतु डेट म्युच्युअल फंडला LTCG (Long Term Capital Gain) लाभापासून आता वंचित ठेवले गेले आहे. आता इतर सामान्य म्युच्युअल फंडबाबत सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार करता म्युच्युअल फंडमध्ये परतावा बऱ्यापैकी चांगला असतो. त्यामुळे नवे सरकारी नियम येण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी योग्य त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला संजय पवार यांनी दिला आहे.

म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ संदर्भांत AMC (Asset Management Company) दर पंधरा दिवसांनी कुठल्या म्युच्युअल फंडची काय कामगिरी आहे याची माहिती देत असते. गुंतवणूकदारांनी वेळोवेळी हे तपासले पाहिजे आणि फायदेशीर ठरतील असे निर्णय घ्यायला हवेत असे देखील संजय पवार यांनी सुचवले आहे.

महागाईचा परिणाम जाणवेल

जागतिक अर्थव्यवस्थेवर सध्या मंदीचे सावट आहे. भारतात देखील याच परिणाम थोड्याबहुत प्रमाणात पाहायला मिळतायेत. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहेत. वाढते रेपो रेट, वाढते व्याजदर हे त्याचेच परिणाम आहेत. वाढते व्याजदर लक्षात घेता गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले पाहिजेत. यामुळे वायफळ खर्च न करता गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार 2023-24 या आर्थिक वर्षांत व्याजदर 7.30% ते 7.40% पर्यंत वाढू शकतात. अशा परिस्थितीत मध्य आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतुन गुंतवणूकदार चांगला परतावा तेही कमी जोखीमेसह मिळवू शकतात असेही पवार म्हणाले.

जागतिक बाजारपेठेची अशीच आहे परिस्थिती

भारत व इतर आशियाई देश ज्या आर्थिक परिस्थितीतून जात आहेत त्याच परिस्थितीतून कमी-जास्त प्रमाणात इतर विकसित देश देखील जात आहेत. येत्या काळात आर्थिक मंदी, कामगारांची उपलब्धता, चलनवाढ आदी मुद्द्यांसह चीनचे आर्थिक धोरण देखील परिणामकारक ठरेल असे संजय पवार यांनी म्हटले आहे.

(सूचना: हा लेख केवळ माहितीसाठी देण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्वावा.)

(News Source : Economics Times)