Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSSC: आता खाजगी बँकेतही उघडता येणार महिला सन्मान बचत खाते, जाणून घ्या सविस्तर

Mahila Samman Saving Certificate

Image Source : www.indiafilings.com

Mahila Samman Saving Certificate: सर्व महिलांकरीता एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत महिला सन्मान बचत खाते उघडण्यासाठी केवळ पोस्ट ऑफिस आणि सरकारी बँकेतच जावे लागत असे. परंतु आता केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांमध्ये महिला सन्मान बचत खाते उघडता येणार आहे. यामुळे महिलांना MSSC खाते उघडणे अतिशय सोपे होणार आहे.

MSSC AC Opened In Private Banks: केंद्र सरकारने एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे की, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँका जसे की ICICI बँक, Axis बँक, HDFC बँक आणि IDBI बँक महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाती चालवण्यास आणि उघडण्यासाठी अधिकृत आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक बँकांना हा अधिकार दिला आहे.

महिला सन्मान बचत योजना म्हणजे काय?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी महिलांसाठी आखलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यातच महिलांना गुंतवणूकीची सवय लागावी आणि अधिकाधिक महिलांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र जारी केले आहे.  'महिला सन्मान बचत पत्र योजना' (Mahila Samman Saving Certificate) म्हणजेच MSSC असे त्या योजनेचे नाव आहे. सरकारच्या या प्रयत्नानंतर गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या वाढणार आहे.

व्याजदर काय आहेत?

महिला सन्मान बचत पत्र योजना ही एकवेळची गुंतवणूक योजना आहे. मात्र तरीदेखील त्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे ही योजना अधिकच आकर्षक झालीय. एमएसएससी योजनेद्वारे महिलांना 7.5 टक्के दरानं व्याज मिळणार आहे. व्याज त्रैमासिक चक्रवाढ पध्दतीने दिले जाईल. जे थेट गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केले जाईल आणि खाते बंद होण्याच्या वेळी दिले जाईल. मुदत ठेव योजनेप्रमाणेच ही एक योजना आहे. यात वयाची अट नाही. कोणत्याही वयातली मुलगी किंवा महिला यामध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत. गुंतवणुकीची मर्यादा मात्र 2 लाख रुपये आहे. महिला या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे गुंतवणूक करू शकत नाहीत. कमीत कमी 1000 रुपये अशी गुंतवणूकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

योजनेचा कार्यकाळ

या योजनेत गुंतवणुकीसाठी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 असा केवळ दोन वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे. या मुदतीनंतर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. महिला सन्मान बचत पत्र  योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलेला काही इमरजंसी आल्यास, एक वर्षानंतर ती तीच्या खात्यामधून 40 टक्के अंशतः रक्कम काढू शकते.