Brand Value Of Mahendra Singh Dhoni: जगभरात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची कमतरता नाही. भारताबरोबरच इतर देशांमध्येही त्याला पसंती मिळत आहे. क्रिकेटच्या अनेक सामन्यांमधून तो बाहेर पडला असेल, पण त्याची इनिंग अजून संपलेली नाही. आज महेंद्रसिंग धोनी आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करीत आहे. क्रिकेट क्षेत्राबरोबरच जाहिरात क्षेत्रात आपले नाव उंचावणारा धोनी 35 पेक्षा जास्त ब्रँडची जाहिरात करतो. तर धोनी जपळपास 18 ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
Table of contents [Show]
महेंद्रसिंग धोनी सध्या 35 हून अधिक ब्रँड्सची जाहिरात करत आहे. मार्केटिंग एजन्सी डफ अँड फेल्प्सच्या मते, धोनी ब्रँडची ब्रँड व्हॅल्यू सध्या 80.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 663 कोटी रुपये आहे. तर निवृत्तीनंतरही धोनी या ब्रँडची ब्रँड व्हॅल्यू वाढतच आहे. एजन्सीच्या मते, जेव्हा त्याने 2020 मध्ये निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याची ब्रँड व्हॅल्यू 61.2 दशलक्ष डॉलर होती आणि त्याच्याकडे 28 ब्रँड होते. सन 2022 मध्ये, त्याची व्हॅल्यू प्रचंड वाढली आणि ब्रँडची संख्या 36 पर्यंत पोहचली.
प्रेक्षकांचा चाहता धोनी
महेंद्रसिंग धोनीला सोशल मीडियावर 75 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात. त्याची क्रेझ यंदाच्या आयपीएलमध्येही दिसून आली. महेंद्रसिंग धोनीने जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा IPL चे डिजिटल ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्म Jio Cinema वर क्रिकेट बघणाऱ्या प्रेक्षकांनी विक्रम मोडला. लोकांमध्ये धोनीबद्दलची ही क्रेझ त्याचा ब्रँड मोठा बनवते आणि ब्रँड व्हॅल्यू वाढविते.
शेअरहोल्डर माही
सध्या महेंद्रसिंग धोनीच्या पोर्टफोलिओमध्ये ई-कॉमर्सपासून वित्तीय सेवा आणि आरोग्यसेवा ते रिअल इस्टेटपर्यंतच्या ब्रँडचा समावेश आहे. ब्रँड धोनीला 2005 मध्ये पहिला ब्रेक मिळाला, जेव्हा त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची जाहिरात मिळाली. सध्या तो इंडिगो पेंट्स, मास्टरकार्ड, मॅट्रिमोनी डॉट कॉम, खत बुक, फायर बोल्ट, अनॅकॅडमी, गरुड एरोस्पेस, कार्स 24 यासह अनेक ब्रँडचा चेहरा आहे. धोनी खाता बुक, गरुड एरोस्पेस, कार्स 24 यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये तो शेअरहोल्डर देखील आहे.
भारताचा जबाबदार नागरिक
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात मोठ्या वैयक्तिक करदात्यांपैकी एक आहेत. तो प्रत्येक वर्षी टॅक्स भरतो. दुसरीकडे, धोनी अनेक वर्षांपासून झारखंडमधील सर्वात मोठा करदाता राहिला आहे. ट्रिब्यून इंडियाच्या अहवालात आयकर विभागाने दिलेल्या माहितीनूसार असे सांगण्यात आले आहे की, महेंद्रसिंग धोनीने चालू मूल्यांकन वर्षात 38 कोटी रुपयांचा आगाऊ आयकर जमा केला आहे. त्यानुसार त्याची अंदाजे कमाई 130 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या आर्थिक वर्षात देखील त्यांने 38 कोटी रुपये आगाऊ कर जमा केला होता आणि 2020-21 मध्ये त्याने 30 कोटी रुपये जमा केले होते. निवृत्तीचा धोनीच्या कमाईवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसून त्यात वाढच झाल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. महेंद्रसिंग धोनी हा क्रीडा जगतातील अशा काही सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे जाहिरात-मार्केटिंगमधील प्रमुख चेहरे आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            