State Economic Advisory Council: महाराष्ट्र सरकारने राज्याची अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील प्रगतीचे धोरण ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) रोजी पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी प्रेस ब्रिफिंगद्वारे प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची पहिली बैठक संपन्न झाली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सदस्यांचा या परिषदेत समावेश करण्यात आला. ही परिषद राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी क्रांतीकारक पाऊल ठरेल. तसेच राज्याच्या आर्थिक विकासाबरोबरच प्रत्येकाच्या राहणीमानाचा विचार ही परिषद करणार आहे. उद्योग, व्यापारासह शेती क्षेत्रातील उत्पादन वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक पुरवठा याबाबत अभ्यास करून ही परिषद सूचना करेल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोडमॅप तयार केला जाईल. तसेच या परिषदेच्या माध्यमातून कृषि, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन, विभागीय असमतोल दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची घोषणा केली होती. या परिषदेच्या अध्यक्षपदी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्त करण्यात आली होती. त्याव्यतिरिक्त या परिषदेच्या सदस्यपदी विक्रम लिमये (Vikram Limaye), डॉ. अजित रानडे (Dr. Ajit Ranade), मिलिंद कांबळे (Milind Kamble), एस. एन. सुब्रमण्यम (S. N. Subrahmanyam), अनंत अंबानी (Anant Ambani) आणि करन अदानी (Karan Adani) यांचा समावेश करण्यात आला आहे.