महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात 65 व्या कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा 10 ते 14 जानेवारी दरम्यान होणार असून महाराष्ट्र केसरी विजेत्या स्पर्धकाला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. सोबतच चांदीची गदा देखील सालाबाद प्रमाणे प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि अडीच लाखांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी असते.
महाराष्ट्रातील 45 तालीम संघातील विविध 18 वजनी गटात सुमारे 900 हून अधिक स्पर्धक भाग घेणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. प्रत्येक वजनी गटातील विजेत्या स्पर्धकाला मोटारसायकल आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे. या गटातील उपविजेत्यांना देखील बक्षीस दिले जाणार आहे. 14 जानेवारी रोजी या स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम सामना रंगणार आहे.
विजेत्याचा चांदीची गदा देऊन सन्मान
कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983 पासून मोहोळ कुटुंबियांच्यावतीने महाराष्ट्र केसरीची गदा देण्यात येते. 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा 1961 साली सुरू झाली. तेव्हापासून चांदीची गदा विजेत्यास दिली जाते. 1982 पर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमार्फत दिली जात असे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी खासदार अशोक (अण्णा) मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यास गदा' देण्याची परंपरा सुरू केली आहे.